शहनाज अख्तर यांच्या भजनांचा खामगावकरांना लळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 12:16 PM2019-09-14T12:16:28+5:302019-09-14T12:17:34+5:30
मुस्लिम परिवारात जन्मलेल्या शहनाज अख्तर यांनी ‘जय श्रीराम’चा जयघोष करताच, उपस्थितांच्या अंगावर शहारे उमटले.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : मुस्लिम परिवारात जन्मलेल्या आणि सुप्रसिध्द भजन गायिका असलेल्या शहनाज अख्तर यांनी खामगावकरांना आपल्या विविध भजनांचा अक्षरक्षा ‘लळा’ लावला. एकाहून सरस भक्तीगीतांची संहिताच हा कार्यक्रम ठरला. मुस्लिम गायिकेने आपल्या सुमधूर आवाजाने गीतं सादर केली त्यावेळी मैदानावरील अनेक हिंदू बांधवांनी भर पावसात नृत्याचा ठेका धरला.
निमित्त होते ते, खामगाव येथील श्री हनुमान गणेश मंडळाने आयोजित केलेल्या भक्तीसंध्येचे. सतिफैलातील श्री हनुमान मंडळाने जबलपूर येथील प्रसिध्द भजन गायिका आणि मुस्लिम परिवारात जन्मलेल्या शहनाज अख्तर यांच्या ‘भगवा रंग’ ही भजन संध्येचे बुधवारी सायंकाळी आयोजित केली. स्थानिक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर भर पावसात ही भजन संध्या पार पडली. ‘माता है गौरा...पिता है महेश...जय हो गणेश तेरी जय हो गणेश’ या गणेश वंदनेने कार्यक्रमाला सुरूवात झाली. त्यानंतर ‘भोले हो गये टनाटन’, ‘मेरे भोले से भोले बाबा’, ‘जब श्याम मेरे सपनों मे आये’ ‘आगे बजरंगी’ अशी विविध भजनं शहनाज अख्तर यांनी गायिली. ‘मुझे चढ गया भगवा रंग’ या गीताने या कार्यक्रमाचा शेवट झाला. संचालन अॅड. अमोल अंधारे यांनी केले. प्रास्ताविक डिगांबर गलांडे यांनी केले. आभार पवन गरड यांनी मानले. यावेळी आमदार अॅड. आकाश फुंडकर, नगराध्यक्षा अनिता डवरे, सागर फुंडकर, हनुमान गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष कृष्णा ठाकूर, नगरसेवक हिरालाल बोर्डे, दर्शनसिंह ठाकूर, हनुमान मंडळाचे अध्यक्ष राम बोंद्रे, नगरसेविका रेखा जाधव, लता गरड, राम मिश्रा, रजपालसिंह चव्हाण यांची उपस्थिती होती.
सामाजिक ऐक्य परिषदेची फलश्रृती!
गणेशोत्सवाच्या सुरूवातीला जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या संकल्पनेतून बुलडाणा जिल्ह्यात सामाजिक ऐक्य परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी सामाजिक सलोखा आणि ऐक्य साधण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले. यामध्ये सतीफैलातील श्री हनुमान गणेश मंडळाने मुस्लिम परिवारात जन्मलेल्या गायिकेची भजन संध्या आयोजित केली. या कार्यक्रमाला अनेक मुस्लिम बांधवांनीही हजेरी लावली. यामध्ये महिलांचीही उपस्थिती लक्षणिय अशीच होती.
जय श्रीरामचा जयघोष!
मुस्लिम परिवारात जन्मलेल्या शहनाज अख्तर यांनी ‘जय श्रीराम’चा जयघोष करताच, उपस्थितांच्या अंगावर शहारे उमटले. सुमधूर आवाजात हिंदू देवी-देवतांची भजनं गातानाच, आपण मंदिरातही जातो. मंदिरात जाण्यात आपल्याला कोणतेही वावडे नसल्याचे सांगतानाच, आपली लोकप्रियता ही देवीचा आशीर्वाद असल्याचीही कबुली त्यांनी यावेळी दिली.