शाकंबरी जिनिंगला आग
By admin | Published: December 28, 2014 12:32 AM2014-12-28T00:32:17+5:302014-12-28T00:32:17+5:30
मलकापूर तालुक्यातील घटना, ५0 लाखाचा कापुस जळूण खाक.
मलकापूर : तालुक्यात मौजे वाघुड शिवारात राष्ट्रीय महामार्ग ६ वरील शाकंबरी जिनिंग प्रेसिंगमध्ये अचानक भीषण आग लागून ४५ ते ५0 लाखांचा गंजीवरचा कापूस जळून खाक झाल्याची माहिती असून, ही घटना सायंकाळी ६.३५ वाजेच्या सुमारास घडली. या संदर्भात अधिक माहिती अशी की, मौजे वाघुड येथे कोल्हे पेट्रोल पंपानजीक शाकंबरी जिनिंग प्रेसिंग आहे. आज सायंकाळी ६.३५ वाजेच्या सुमारास तेथील कापसाच्या गंज्यांनी एकापाठी एक असा पेट घेतला. पाहता-पाहता अचानक लागलेल्या आगीने मोठय़ा प्रमाणात उग्र रूप धारण केले.
यासंदर्भात जिनिंग प्रेसिंगचे संचालक संतोष अग्रवाल यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की आजवर या हंगामात खरेदी केलेला कापूस त्याच शेडमध्ये होता. त्याच्या गंज्या होत्या. अचानक आग लागल्याने आमच्यासह कर्मचारी व कामगारही हैराण झाले. घटना घडल्यानंतर माहिती कळताच नगरपरिषदेचे दोन, बाजार समिती व वीरचंद नरशी ग्रुपचे प्रत्येकी एक असे तीन अग्निशामक घटनास्थळी दाखल झाले. त्यांची आग शमविण्यात मदत झाली. सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास आग शमली; मात्र तोवर ४५ ते ५0 लाखांचा कापूस जळून खाक झाल्याचा अंदाज प्राप्त माहितीवरून वर्तविण्यात येत असून, शाकंबरी जिनिंगला लागलेली काळातील ही दुसरी आग आहे.