अंगणवाडीत मिळणार शेवई, शिरा, उपमा!

By Admin | Published: July 11, 2017 12:06 AM2017-07-11T00:06:05+5:302017-07-11T00:43:17+5:30

महिला व बाल कल्याण विभागाचा अभिनव उपक्रम : सुदृढ आरोग्यासाठी आहारात बदल

Shampoo, vein, upma, will be found in the anganwadi | अंगणवाडीत मिळणार शेवई, शिरा, उपमा!

अंगणवाडीत मिळणार शेवई, शिरा, उपमा!

googlenewsNext

हर्षनंदन वाघ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : ग्रामीण भागातील लहान मुले, किशोरवयीन मुली तसेच गरोदर व स्तनदा मातांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण आहार देण्यात येतो. त्यात वरणभात, खिचडी, उसळ, सुगडीचा समावेश होता. मात्र, आता मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी पोषण आहारात बदल करण्यात आला असून, या सत्रापासून शेवई, शिरा, उपमा देण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील मुले, महिला यांचे आरोग्य चांगले व सुदृढ राहण्यासाठी दरवर्षी अंगणवाडीच्या माध्यमातून प्रतिवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. शाळेत येणारी मुले उपाशी किंवा कुपोषित राहू नये म्हणून शासनाने खबरदारी घेतली आहे. मुलांचा प्राथमिक स्तर गुणवत्तापूर्वक व निरोगी व्हावा, हा उद्देश ठेवून अंगणवाडीत मुलांना शक्य त्या सर्व सोयी, सुविधा देण्यावर शासनाचा भर आहे. त्यात उत्तम आहार, दर्जेदार शिक्षणाबरोबर गुणवत्ता वाढीसाठीही विशेष उपक्रम राबविले जातात. पहिलीच्या शाळेत जाण्यापूर्वी म्हणजे ६ वर्षांपर्यंतची मुले अंगणवाडीत शिक्षण घेत असतात. या मुलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी वरणभात, लापशी, खिचडी, उसळ तसेच सुखडी देण्यात येते. याशिवाय अंगणवाडीत न जाणारी ६ महिने ते ३ वर्षांखालील मुले, ११ ते १८ वर्षांखालील किशोरवयीन मुली तसेच गरोदर व स्तनदा माता यांच्यासाठी अंगणवाडीच्या माध्यमातून खायला चवदार व पोषक असलेले सुखडीचे २ पॅकबंद पाकिटे देण्यात येतात. मात्र आता पोषण आहारात बदल करण्यात आला असून, आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले व जे खराब होणार नाहीत, शिवाय उत्तम आहार आणि दर्जा असलेले पदार्थ देण्यात येणार आहेत. यात शेवई, शिरा, उपमा व सुखडी अशा भरपूर पदार्थांचा समावेश असून, यामध्ये गहू, साखर, सोयाबीन, मूग, शेंगदाणे, सूक्ष्म पोषकतत्त्वे, गुळ, स्निग्धरहित सोया, खाण्याचे तेल, साखर, चणा, मसाले, असे आरोग्यासाठी अत्यंत चांगले असलेले घटक या खाऊत सामावलेले असणार आहेत.

पोषण आहाराची तीन पाकिटे मिळणार!
अंगणवाडीतील मुलांना पूर्वीप्रमाणे बचत गटामार्फत असलेले वरणभात, लापशी, खिचडी, उसळ, जेवण व नाश्ता देण्यात येत आहे, त्यात मात्र सध्या कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पण, शाळेत न येणारे ६ महिने ते ३ वर्षांचे मुले, किशोरवयीन मुली, गरोदर व स्तनदा माता यांना शेवई, शिरा, उपमा हा नवीन पोषण आहार मिळणार असून, त्यांना २५ दिवसांतून प्रत्येकी तीन पाकिटे मिळणार आहेत.

ग्रामीण भागातील अंगणवाडीतील मुलांसाठी नेहमीचा पोषण आहार देण्यात येत आहे. मात्र, अंगणवाडीत न येणारे ६ महिने ते ३ वर्षांची मुले, किशोरवयीन मुली, गरोदर व स्तनदा माता यांना शासनाच्या नवीन निर्देशानुसार पोषण आहार देण्यात येईल.
- सी. बी. चेके,
उपमुकाअ , महिला व बालकल्याण जि.प. बुलडाणा.

Web Title: Shampoo, vein, upma, will be found in the anganwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.