करवीर व संकेश्वर पीठाचे शंकराचार्य येणार एकाच व्यासपीठावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 02:43 PM2018-11-17T14:43:19+5:302018-11-17T14:43:30+5:30
- ब्रम्हानंद जाधव बुलाडणा: करवीर पीठ व कर्नाटकच्या संकेश्वर पीठाचे शंकराचार्य एका व्यासपीठावर एकत्र आणण्याचा दुर्मीळ योग मेहकर येथे ...
- ब्रम्हानंद जाधव
बुलाडणा: करवीर पीठ व कर्नाटकच्या संकेश्वर पीठाचे शंकराचार्य एका व्यासपीठावर एकत्र आणण्याचा दुर्मीळ योग मेहकर येथे २२ नोव्हेंबर रोजी होत असलेल्या श्वासानंद नामजप अभियान व गुरूपरंपरेच्या गुरूपीठाधीश गौरव सोहळ्यात पाहावयास मिळणार आहे. आदिनाथापासून चालत आलेल्या या गुरूपरंपरेला धार्मिक महत्व आहे. त्यामुळे दोन वेगवेगळ्या पीठाच्या शंकराचार्यांसह राज्यातील अनेक गुरूपीठाधीशांची मांदियाळी याठिकाणी जमणार आहे.
जगातील ११ नृसिंहस्थानापैकी सहावे नृसिंह मंदिर बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे आहे. या नृसिंहाच्या पितळे घराण्याच्या नऊ पिढ्यांच्या उपासनेचे फळ म्हणून परहंस परिवाजकाचार्य १००८ ओम ब्रह्मी श्वासानंद सरस्वती उपाख्य संत बाळाभाऊ महाराज पितळे यांचा अवतार १८८८ मध्ये झाला. त्यांना वयाच्या नवव्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या नाथ परंपरेतील संत आनंदी आत्मानंद सरस्वती रंगनाथ महाराज (नाव्हा जि. जालना) यांचा अनुग्रह प्राप्त झाला. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी मेहकर ते पंढरपूर अशी विदर्भातील पहिली दिंडी सुरू करून विदर्भात वारकरी संप्रदायाचे बीजारोपण केले. त्यांनी कीर्तन, प्रवचन, नामसप्ताह, चातुर्मास्य, यज्ञयाग, दिंड्या यांच्या माध्यमातून समाजाला आत्मिक उद्धारासाठी दिशादर्शन केले. लोकोद्धारासाठी त्यांनी भारतभर व नेपाळमध्ये भ्रमन्ती केली. त्यांचे चतुर्थ उत्तराधिकारी विद्यमान गुरूपीठाधीश अॅड. रंगनाथ महाराज पितळे यांनी वकिली व्यवसायाचा त्याग करून ते गुरूकार्यासाठी कीर्तन, प्रवचन, भागवतकथा यांच्या माध्यमातून समाजप्रबोधन आणि लोकोद्धारासाठी अखंड भ्रमंती करीत असतात. कार्तीक शुद्ध चतुर्दर्शी २२ नोव्हेंबर रोजी त्यांचा अमृतमहोत्सव व संपुर्ण महाराष्ट्रभर राबविण्यात आलेले श्वासानंद नामजप अभियानाची सांगता सोहळा मेहकर येथील बालाजी मंदिरात होणार आहेत. १९ व्या शतकातील संत बाळाभाऊ महाराज पितळे यांच्या संस्थानच्या भक्तवर्गाच्या वतीने होणारा हा सोहळा गुरूपरंपेतील महत्वाचा आहे. या सोहळ्यात महाराष्ट्राच्या करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती व कर्नाटकच्या संकेश्वर पीठाचे शंकराचार्य अभिनव सच्चिदानंद भारती हे एकत्र येणार आहेत. दोन पीठांचे शंकराचार्य एकत्र येणार असल्याने या सोहळ्याला धार्मिक महत्व वाढले आहे.
गुरूपरंपरेचे ३३ वे गुरूपीठाधीश
विद्युमान गुरूपीठाधीश अॅड. पितळे महाराज हे भगवान शंकरापासून सुरू झालेल्या प्राचीन मूळ गुरूपरंपरेच्या गादिवरील ३३ व्या क्रमांकाचे गुरूपीठाधीश आहेत. या मूळ गुरूपरंपरेमध्ये आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, मीननाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, चांगदेव, या पूर्वकालीन श्रेष्ठ साधुसंतांचा समावेश आहे.
संतमहंताची मांदियाळी
दोन्ही प्रमुख पीठांचे शंकराचार्य एकाच वेळी एकाच व्यासपीठावर येण्याचा दुर्मिळ योगायोग आहे. त्यामुळे भक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे. या सोहळ्यात शंकराचार्यांसह जितेंद्रनाथ महाराज, अनिरुद्ध महाराज, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्यासह अनेक संतमहंताची मांदियाळी जमणार आहे. त्यानंतर शेकडो कीर्तनकार प्रबोधनकारांची उपस्थिती राहणार आहे.