शेगाव नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यास लाच घेताना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 12:05 PM2019-02-02T12:05:34+5:302019-02-02T12:14:07+5:30
शेगाव: निवासी असलेल्या प्लॉटची वाणिज्य विषयक नोंद करण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या शेगाव मुख्याधिकाऱ्यांसह रोखपालास पकडण्यात आले. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी सकाळी ९ वाजता केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव: निवासी असलेल्या प्लॉटची वाणिज्य विषयक नोंद करण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या शेगाव नगर पालिका मुख्याधिकारी अतुल पंत आणि रोखपाल आर.पी.इंगळे पकडण्यात आले. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी सकाळी ९ वाजता केली. या कारवाईमुळे शेगावसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील एका निवासी प्लॉटची वाणिज्य विषयक नोंद करण्यासाठी दस्तवेज पालिकेत सादर करण्यात आले. दरम्यान, या प्लॉटची वाणिज्य विषयक नोंद करण्यासाठी ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी रोखपालाच्या मध्यस्थीने मुख्याधिकाऱ्यांनी केली. त्यानंतर याप्रकरणी संबधितांनी याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शेगाव पालिकेचे रोखपाल आर.पी. इंगळे यांच्या घरी धडक दिली. त्याचवेळी या पथकातील काही कर्मचारी मुख्याधिकाऱ्यांच्या घरी धडकले. दरम्यानच्या काळात रोखपाल आणि मुख्याधिकाºयांचे संभाषण झाले. मुख्याधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून एक लाख २० हजाराची रक्कम स्वीकारताना रोखपाल आर.पी. इंगळे यांना ताब्यात घेण्यात आले. त्याचवेळी दुसऱ्या पथकाने मुख्याधिकाऱ्यांनाही ताब्यात घेतले. निवासी प्लॉटची वाणिज्यविषयक नोंद करण्यासाठी सुरूवातीला पाच लक्ष रुपयांची मागणी करण्यात आली. मात्र, शेवटी एक लाख २० हजार रुपयांवर तडजोड ठरली होती. याप्रकरणी मुख्याधिकारी अतुल पंत आणि रोखपाल आर.पी.इंगळे यांची कसून चौकशी सुरू असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सांगितले. या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरली असून, शेगाव पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. (शहर प्रतिनिधी)