शेगाव पालिका ९0 कर्मचारी संपावर
By admin | Published: July 22, 2014 11:43 PM2014-07-22T23:43:03+5:302014-07-22T23:43:03+5:30
राज्यातील नगर पालिका कर्मचारी १५ जुलै पासून संपावर गेले आहेत. यामध्ये ८ दिवसानंतर शेगाव नगर पालीकेचे कर्मचारी सामील झाले
शेगाव : राज्यातील नगर पालिका कर्मचारी १५ जुलै पासून विविध न्याय मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. यामध्ये ८ दिवसानंतर आज मंगळवार पासुन शेगाव नगर पालीकेचे कर्मचारी या संपात सामील झाले असुन ९0 कर्मचार्यांनी संपात सहभाग घेतला. सेवानवृत्त कर्मचार्यांचे १00 टक्के वेतन शासकीय कर्मचार्यांप्रमाणे व्हावे. नगर पालिका कर्मचारी व सेवानवृत्त कर्मचार्यांची सहाव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम त्वरीत अदा करण्यात यावी, कर्मचार्यांच्या वेतनासाठी शंभर टक्के अनुदान देण्यात यावे, नगर पालिकेतील अनुकंपाधारकास तात्काळ नियुक्ती देण्यात यावी, सफाई कामगारांना मोफत घरे बांधून देण्यात यावी, नगर पालिका कर्मचार्यांना कालबध्द पदोन्नती तात्काळ लागू करावी, कर्तव्य बजावताना अपंगत्व आलेल्या कर्मचार्यांना व अपंग कर्मचार्यांना विशेष लाभ देण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी नगर पालिका कर्मचारी संपावर गेले आहेत. यासह १९ मागण्यांच्या पुर्ततेसाठी राज्यातील न.प. कर्मचार्यांनी १५ जुलैपासुन काम बंद आंदोलन पुकारले होते. मात्र शेगाव नगर पालीकेतील अंतर्गत गटबाजीमुळे या न.प. मध्ये कर्मचारी संपावर गेले नव्हते. मात्र राज्यस्तरीय पदाधिकार्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर आज मंगळवारपासून येथील कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. यामध्ये १८१ पैकी न.प. मधील ९0 कर्मचार्यांनी संप पुकारला आहे. कर्मचार्यांच्या या संपामुळे पालिकेतील अनेक विभाग सामसूम असल्याचे चित्र आज मंगळवारी दिसून आले. शिवाय प्रशासकीय कामकाज प्रभावित झाले आहे. सामान्य प्रशासन, कर, शिक्षण , आस्थापना, विद्युत आदी विभागाचे कर्मचारी संपावर गेल्यामुळे हे कार्यालय ओस पडले आहे.