शेगावचे राजकारण वरिष्ठांपर्यंत पोहचविणार
By admin | Published: July 20, 2014 11:42 PM2014-07-20T23:42:54+5:302014-07-20T23:42:54+5:30
शेगावात उपाध्यक्ष पदासाठी तसे झाले नाही. राष्ट्रवादीचे उमेदवार असतांना सुध्दा काँग्रेसने निवडून आणले नाही.
शेगाव : राज्यासह संपूर्ण जिल्ह्यात नगराध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये युती केल्या नंतर सर्वच ठिकाणी या युतींच्या माध्यमाने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष विराजमान झालेत. मात्र शेगावात उपाध्यक्ष पदासाठी तसे झाले नाही. राष्ट्रवादीचे उमेदवार असतांना सुध्दा काँग्रेसने निवडून आणले नाही. त्यामुळे या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहचविणार असल्याची माहीती रा.कॉ.चे शहराध्यक्ष अमित जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१७ जुलै रोजी शेगावात पार पडलेल्या नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अध्यक्षपदी काँग्रेसचे बंडुबाप्पु देशमुख यांची अविरोध तर उपाध्यक्षपदी भाजपाच्या सौ. ज्योतीताई मुंधडा निवडून आल्या. या निवडणुकीत काँग्रेसच्या १0 पैकी ४ सदस्यांनीच रा.काँ. समर्थीत नगरविकास आघाडीचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार संदीप काळे यांना मतदान केले. दोन नगरसेवकांनी भाजपाच्या सौ. मुंधडा यांच्यासाठी मतदान केल्याने नविआच्या उमेदवाराचा पराभव झाला. यावेळी काळे हे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी असल्याचा आरोप झाल्याने राष्ट्रवादीने त्याबाबत बाजु मांडण्यासाठी शनिवारी रात्री पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी संदीप काळे हे नगरविकास आघाडीच्या माध्यमाने निवडून आल्यानंतर रा.कॉ. मध्ये अधिकृत प्रवेश त्यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या विरोधातही त्यांनी काम केले. या पत्रकार परिषदेत नगरसेवक संदीप काळे यांनीही आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच असल्याचा खुलासा केला. या पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्ष शैलेंद पाटील यांची उपस्थिती होती.