शेगाव रेल्वे स्टेशन परिसर हिरवाईने नटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 11:25 AM2020-08-31T11:25:14+5:302020-08-31T11:25:28+5:30
शेगाव रेल्वे स्टेशन परिसरात सुमारे १५ हजार चौ. फूट जागेवर बहुउद्देशीय पर्यावरण पूरक प्रकल्पाचा प्रारंभ शनिवारी करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : गो ग्रीन फाउंडेशनने 'हरित संतनगरी शेगाव ' चा ध्यास घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून मध्य रेल्वेच्या मदतीने शेगाव रेल्वे स्टेशन परिसर हिरवाईने नटवण्याचा संकल्प सोडला आहे.
याअंतर्गत शेगाव रेल्वे स्टेशन परिसरात सुमारे १५ हजार चौ. फूट जागेवर बहुउद्देशीय पर्यावरण पूरक प्रकल्पाचा प्रारंभ शनिवारी करण्यात आला. फाउंडेशनची पर्यावरण विषयक तळमळ पाहून स्थानिक रेल्वे प्रशासनानेदेखिल मध्य रेल्वेच्या वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून रेल्वे स्टेशन परिसरात तब्बल १५ हजार चौ. फूट जागा पर्यावरण पूरक उपक्रमासाठी गो ग्रीन फाउंडेशनला दिली आहे.
त्या जागेवर फाउंडेशनच्यावतीने मियावाकी वन निर्मितीनिर्मितीसह भविष्यात विविध पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. प्रकल्पाची सुरूवात शेगाव रेल्वे स्टेशनचे प्रबंधक प्रकाश पुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले. गो ग्रीन फाउंडेशन व मध्य रेल्वेच्या सहभागाने शेगाव रेल्वे स्टेशन परिसरात साकार होणारा हा पर्यावरण पूरक प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अर्थात पीपीपी मॉडेल आहे.
या उपक्रमासाठी जागेसह पाणी व इतर अनुषंगिक सुविधा उपलब्ध करून देण्यास मध्य रेल्वेच्या वरिष्ठ कार्यालयाने परवानगी दिली आहे. गो ग्रीन फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचे पर्यावरणप्रेम वृक्षारोपणाचे कार्य सुलभ व्हावे यासाठी अर्थ आॅगर मशिन भेट देण्यात आली.