शेगाव उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा कोलमडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 03:44 PM2019-06-24T15:44:53+5:302019-06-24T15:45:50+5:30
शेगाव : येथील उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा फक्त नावालाच उरल्या असल्याचे वास्तव आहे.
- विजय मिश्रा
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : येथील उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा फक्त नावालाच उरल्या असल्याचे वास्तव आहे. आरोग्य विभागाच्या उपसंचालकांनी याप्रकाराची दखल घेवून वैद्यकीय प्रशासनाला जाब विचारून रुग्णसेवा सुरळीत करावी अशी मागणी होत आहे.
शेगाव येथे नेहमी वर्दळ राहते. शहरात घडणाऱ्या घटनांचे प्रमाणही जास्त आहे. शिवाय आजूबाजूच्या खेड्यामधील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र फक्त ‘रेफर टू’ पुरतेच उरले आहेत. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची गर्दी राहते. याठिकाणई एकूण २०० बेड ची रुग्णांची व्यवस्था आहे. सर्व मिळून १८० कर्मचारी याठिकाणी कार्यरत आहे. यात १ अधीक्षक, ३ बाल रोग तज्ञ, ३ स्त्री रोग तज्ञ व इतर १२ डॉक्टर्स येथे कार्यरत आहेत. याठिकाणी सर्वप्रकारच्या उपचार सुविधा मिळणे अपेक्षीत आहे. मात्र वैद्यकीय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे येथील कारभार ढेपाळला आहे. याठिकाणी कार्यरत ७० टक्के आरोग्य कर्मचारी हे बाहेरगावाहून अपडाऊन करीत आहेत. त्यामुळे केवळ नावापुरती डयुटी करून कर्तव्यात कसूर केली जाते. त्याचा परिणाम आरोग्यसेवेवर होतांना दिसतो. याशिवाय औषधाचाही तुटवडा असल्याचे कर्मचारी सांगत आहेत. त्यामुळे उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णासाठी बाहेरून औषध आणून जीव वाचविण्याशिवाय नातेवाईकाकडे पर्याय राहत नाही. रुग्णालयीन प्रशासन ढेपाळले असल्याने रुग्णालयाच्या आवारात सर्वत्र घाण पसरली आहे. मागील दहा वषार्पासून या रुग्णालयाला खासदारांनी भेट दिली नाही किंवा त्यांच्या अनुदानातून किंवा प्रयत्नातून कोणतीही सुविधा त्यांनी इथे उपलब्ध झाली नसल्याचेही वास्तव आहे. मात्र तत्कालीन आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी या रुग्णालयात अत्याधुनिक उपचारसुविधा मिळाव्यात यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. नव्हे त्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. सध्या पावसाळ््याचे दिवस आहेत. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता राहते. सध्या प्रभारी अधीक्षक अश्विनी मानकर या अधीक्षकांची जबाबदारी सांभाळत आहेत.
तर शेगाव तालुका आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. प्रविण घोंगटे हे पदभार सांभाळत आहेत. दोन्हीही अधिकाऱ्यांना आपल्या कर्तव्याशी काहीही सोयरसुतक नसल्याचे दिसून येते. वरिष्ठांनी याची दखल घेणे गरजेचे झाले आहे.
‘रेफर टू’ चा प्रकार बंद होईल काय?
या रुग्णालयात सर्वप्रकारची यंत्रसामुग्री आहे. सिझेरियनसह जनरल सर्जरी, डोळ्याचे आॅपरेशन याठिकाणी होणे अपेक्षीत आहेत. गतवर्षीच याठिकाणी डायलेसीस युनिट सुद्धा सुरु करण्यात आले आहे. परंतू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे याठिकाणी रुग्णसेवा मिळणे दुरापास्त झाले आहे. कोणताही पेशंट आला की ‘रेफर टू अकोला’ची चिठ्ठी त्याच्या हाती दिले जाते. हा प्रकार बंद होण्याची गरज आहे.
उपजिल्हा रुग्णालयातील कारभाराची शहानिशा करण्यात येईल. येथील आरोग्य सेवा सुरळीत करण्यासाठी नक्की प्रयत्न करण्यात येतील.
- डॉ. प्रेमचंद पंडीत
जिल्हा शल्य चिकित्सक, बुलडाणा