शेलगाव ज. पाझर तलाव दुरुस्तीचा मार्ग मोकळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:36 AM2021-04-02T04:36:14+5:302021-04-02T04:36:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : तालुक्यातील शेलगाव जहागीर येथील पाझर तलावाच्या भिंतीला सायाळ नावाच्या प्राण्याने मोठे भगदाड पडले होते. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : तालुक्यातील शेलगाव जहागीर येथील पाझर तलावाच्या भिंतीला सायाळ नावाच्या प्राण्याने मोठे भगदाड पडले होते. तथापि, तलावाच्या भिंतीवर झाडे-झुडपे वाढलेली असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी सन २०१९ मध्ये स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांनी केली. दरम्यान, अशाच प्रकारे इतर तलावांच्या दुरुस्तीची लक्षात घेता आ. श्वेता महाले यांनी मतदारसंघातील १७ तलावांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळविला असल्याने शेलगाव ज. येथील पाझर तलावाच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.
शेलगाव ज. येथील पाझर तलावाचे बांधकाम १९९० पूर्वी झालेले आहे. तेव्हापासून याची देखभाल दुरुस्ती करण्यात आली नसल्याने यावर झाडेझुडपे वाढलेली होती. तसेच सायाळ नावाच्या प्राण्याने भिंतीच्या मधोमध मोठे भगदाड पाडले होते. यामुळे धरण फुटण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण होते. याची दखल घेत भितींची देखभाल दुरुस्ती करण्यात यावी, यावर तातडीने उपाययोजना व्हाव्यात, अशी मागणी विनायक सरनाईक यांनी जि.प. सिंचन विभाग व जिल्हाधिकारी, प्रादेशिक सिंचन विभाग, अमरावती यांच्याकडे ग्रामपंचायत ठराव व पत्राव्दारे ७ ऑक्टोबर २०२१ रोजी केली होती. यावरून गतवर्षी वर्षी तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करून भिंतीवरील झाडे, झुडपे काढण्यात आली होती. परंतु धरणामध्ये पाणी असल्याने व निधीअभावी हे काम रखडले होते. उर्वरित पिचिंग व भरावाचे काम पूर्ण करण्याचे अश्वासन सिंचन विभागाकडून देण्यात आले होते. दरम्यान, अशाच प्रकारे मतदार संघातील सर्व लहान-मोठ्या तलावांना दुरुस्तीची गरज असल्याने आमदार श्वेता महाले यांनी मतदार संघातील १७ तलावांच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी मिळविला आहे. यामध्ये शेलगाव ज. तलावाचा समावेश असून तलाव दुरुस्तीसाठी २० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे विनायक सरनाईक यांची मागणी पूर्ण होणार असल्याने सरनाईकांनी या कामासाठी निधी मिळविल्याबद्दल आमदार श्वेता महाले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. (तालुका प्रतिनिधी) ..............................