खडकपूर्णाच्या कालव्यात पडून मेंढपाळाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 11:23 AM2021-02-20T11:23:01+5:302021-02-20T11:25:15+5:30
Buldhana News किसन शेळके (३८) हे खडकपूर्णाच्या कालव्यालगत पाणी पिण्यासाठी गेले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंढेरा : खडकपूर्णा प्रकल्पाच्या कालव्यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या एका मेंढपाळाचा पाय घसून तो कालव्यात पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना १८ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली. प्रकरणी अंढेरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
अंढेरा पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या पिंप्री आंधळे शिवारातून जाणाऱ्या खडकपूर्णा प्रकल्पाच्या मोठ्या कालव्यात ही दुर्घटना घडली. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेल्या वडाळा वळसा येथील कारभारी किसन शेळके व शंकर गुणाजी सोरमारे हे मेंढपाळ सध्या अंढेरा परिसरात मेंढ्या चारण्यासाठी आलेले आहेत. दरम्यान त्यांनी त्यांच्याकडील एक बोकड विक्री करून मद्यप्राशन केले होते. दरम्यान १८ फेब्रुवारीला अंढेरा तथा पिंप्री आंधले परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट होत होती. या कालावधी दरम्यानच कारभारी किसन शेळके (३८) हे खडकपूर्णाच्या कालव्यालगत पाणी पिण्यासाठी गेले होते.
या दरम्यान त्यांचा पाय घसरून ते कालव्यात पडले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पिंप्री आंधळे शिवारातील नागरिकांनी याची माहिती ठाणेदार राजवंत आठवले यांना दिली. त्यावेळी पावसातच त्यांनी व त्यांचे सहकारी उगले, समाधान झिने यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून कारभारी शेळके यांचा शोध घेतला. मात्र पाण्याचा प्रवाह अधिक होता. त्यामुळे त्यांनी खडकपूर्णाच्या अभियंत्यांना कालव्याचे पाणी बंद करण्यास सांगितले. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी कालव्यातील पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर मृतक कारभारी शेळके याचा मृतदेह सापडला. शवविच्छेदनासाठी त्याचे पार्थिव शुक्रवारी चिखली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. शवविच्छेदनानंतर ते मृतकाच्या कुटुंबीयांकडे देण्यात आले आहे. याप्रकरणी अंढेरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा पुढील तपास बीट जमादार वाघ हे करीत आहेत.