वनकर्मचाऱ्यांवर मेंढपाळांचा हल्ला, ८ जणां विरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 12:43 PM2021-08-18T12:43:57+5:302021-08-18T12:44:07+5:30
Crime News : १६ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा ८ मेंढपाळांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुलडाणा: ज्ञानगंगा अभयारण्यात वन्यजीव विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर मेंढपाळांनी हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा ज्ञानगंगा अभयारण्य लगतच्या प्रादेशिक वनविभागाच्या जंगलात तशीच घटना १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली. गस्तीवर असलेले बुलडाणा एसीएफ व कर्मचाऱ्यांवर मेंढपाळांनी हल्ला करून शासकीय गाडीच्या काचा फोडून जप्त केलेल्या मुद्देमालासहित अटकेतील आरोपींना पळविण्यात आले होते. या प्रकरणी १६ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा ८ मेंढपाळांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुलडाणा प्रादेशिक वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक रणजीत रघुवीर गायकवाड हे सोमवारी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह बुलडाणा-खामगाव मांडणी शिवारात गस्तीवर होते. त्यावेळी जंगलात काही लोक अवैध वनचराई करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तेव्हा अधिकाऱ्यांनी मेंढ्या जप्तीची कारवाई सुरू केली व दोन जणांना ताब्यात घेऊन शासकीय वाहनात बसवले.
त्यावेळी मेंढ्याच्या कळपाचा मालक मोतीराम रतन टिळे आला व काही जण आले. त्यांनी वनविभागाच्या शासकीय गाडीवर हल्ला करून वाहनाच्या काचा फोडल्या, तसेच सहायक वनसंरक्षक गायकवाड व वनविभागाचे संतोष गिरनारे यांना मारहाण करून पकडण्यात आलेल्या दोन्ही आरोपींनाही पळवून घेऊन गेले. या प्रकरणी हिवरखेड पोलीस ठाण्यात एसीएफ रंजीत गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवर हिवरखेड पोलिस ठाण्यात आरोपी मोतीराम रतन टिळे (रा. नांद्री ता. खामगाव) याच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला
आहे. मंगळवारी १७ ऑगस्ट रोजी पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. प्रादेशिक व वन्य जीवचे अधिकारी उपस्थित हाेते.