शिंदे गटाच्या खासदाराची पलटी, माझा आरोप उद्धव ठाकरेंवर नाही, तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 04:11 PM2022-10-02T16:11:26+5:302022-10-02T16:12:14+5:30
शिंदे गटात जाण्यासाठी आमदारांनी खोके घेतल्याचा आरोप आणि टिका ठाकरे गटाकडून होत आहे.
बुलढाणा - एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठी गळती लागली आहे. एकीकडे पक्ष, संघटना वाचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे झटताना दिसत आहे. तर दुसरीकडे, शिंदे गटाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. यानंतर शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. यातच शिंदे गटातील एका खासदाराने केलेल्या गौप्यस्फोटावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मात्र, एकाच दिवसात या खासदार महोदयांनी आपले शब्द फिरवले असून माझ्या विधानाचा अर्थ तसा नव्हता, असे स्पष्टीकरण दिले आहे.
शिंदे गटात जाण्यासाठी आमदारांनी खोके घेतल्याचा आरोप आणि टिका ठाकरे गटाकडून होत आहे. त्यातच, जसजसा दसरा जवळ येत आहे, तसे दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि शिवसेनेतील आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होताना पाहायला मिळत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात १ आक्टोंबर रोजी शिवसेना शिंदे गटाकडून हिंदू गर्व गर्जना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात आपल्या भाषणात बुलढाणा खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे हेच खरे गद्दार असल्याचा आरोप केला. इतकेच नव्हे दर महिन्याला शंभर खोके मातोश्रीवर जायचे असा घणाघाती, गंभीर आरोपही त्यांनी केला होता. मातोश्रीवर लावलेल्या या गंभीर आरोपाचे परिणाम संपूर्ण राज्यभरातून उमटत असताना शिवसेना नेत्यांकडून याचे खंडन केले जात आहे. आज 2 ऑक्टोंबर गांधी जयंती दिनीच आपल्या कालच्या वक्तव्यावरून खासदार प्रतापराव जाधव यांनी यू टर्न घेतला. मी केलेले ते आरोप फक्त उद्धवजीवर नसून संपूर्ण महाविकास आघाडीवर केल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
दरम्यान, प्रतापराव जाधव यांनी केलेल्या या दाव्यानंतर एकच खळबळ उडाल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंत शिंदे गटातील आमदारांना ‘५० खोके एकदम ओके’, असा टोला शिवसेनेकडून लगावण्यात येत होता. मात्र, आता शिंदे गटात गेलेल्या खासदारांनी थेट उद्धव ठाकरे यांनाच “शंभर खोके एकदम ओके”, या शब्दांत पलटवार केला आहे. मात्र, प्रतापराव जाधव यांनी आपले म्हणणे तसे नव्हते, म्हणत स्पष्टीकरण दिले आहे. तसेच, शिवसेनेसह आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही लक्ष्य केलं आहे.