शेगावात भाविकांची मांदियाळी!
By Admin | Published: July 5, 2017 12:25 AM2017-07-05T00:25:21+5:302017-07-05T00:28:29+5:30
आषाढी एकादशी: संत गजानन महाराजांच्या पालखीची नगर परिक्रमा
गजानन कलोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : ‘उदंड पाहिले उदंड ऐकिले।
उदंड वर्णिले क्षेत्र महिमे
ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर।
ऐसा विटेवरी देव कोठे
ऐसी संतजन ऐसे हरिदास।
ऐसा नामघोष सांगा कोठे।
तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे।
पंढरी निर्माण केली देवो।।
धन्य आज दिन संत दर्शनाचा।
अनंत जन्मांचा शिन गेला
मज वाटे त्यांसी आलिंगन द्यावे।।
या अभंगाचा प्रत्यय संतनगरीत आषाढी एकादशीनिमित्त दीड लाख भाविकांनी आषाढ शु. देवशयनी आषाढी एकादशी श्री गजाननच्या पंढरीत उपस्थिती दर्शवित प्रतिपंढरपूर श्रींचे समाधी दर्शन घेऊन आषाढी एकादशी महोत्सव साजरा केला. मंगळवारी श्रींचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासून भक्तांची रांग लांबच लांब लागली होती.
आषाढी एकादशीनिमित्त श्री गजाननाची पालखी दुपारी २ वा. परिक्रमेकरिता श्रींच्या मंदिरातून निघाली. तत्पूर्वी श्री गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांनी श्री गजानन महाराजांच्या रजत मुखवट्याचे पूजन व श्री विठ्ठलाच्या तैलचित्राचे पूजन केले. त्यानंतर श्रींची पालखी मंदिरातून ढोलपुरी गेट, श्री दत्त मंदिर, जुने महादेव मंदिर, भोईपुरा, श्री शीतलनाथ महाराज संस्थान धर्मशाळा, फुले नगर, श्री मारोती मंदिर, आठवडी बाजार, बसस्थानक, व्यापारपेठ मार्गाने मंदिरात पोहोचली. श्रींचे प्रकटस्थळ येथे विश्वस्त गोविंदराव कलोरे तर महादेव मंदिर येथे विश्वस्त विश्वेश्वर त्रिकाळ, मारोती मंदिर येथे विश्वस्त अशोकराव देशमुख यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली. श्रींच्या परिक्रमा मार्गात श्रींचे भक्त श्रावण पांडे, हरिभाऊ पांडे, किशोर टांक यांच्यावतीने वारकऱ्यांना चहा देण्यात आला. श्रींच्या पालखीसमवेत श्री गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त नारायणराव पाटील, गोविंदराव कलोरे, अशोकराव देशमुख, डॉ.रमेश डांगरा, विश्वेश्वर त्रिकाळ, पंकज शितुत तसेच गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाचे शरद शिंदे, राजेश शेगोकार आदी मान्यवर सहभागी झाले होते. श्रींची पालखी संध्याकाळी मंदिरात आल्यानंतर महाआरती झाली. श्री क्षेत्र पंढरपूरला श्री गजानन महाराजांच्या शाखेत ४ लाखाच्यावर भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. यावेळी भक्तांना संस्थानच्यावतीने ११० क्विंटल साबुदाणा खिचडी वाटप तसेच लाखो केळी, लाडू तीन दिवस प्रसादाचे वाटप केल्या गेले, तसेच दशमी, द्वादशीला मसाला भाताचे वितरण करण्यात आले. श्रींच्या पंढरपूर शाखेत संस्थानच्यावतीने ११० भजनी दिंड्यांना भजनी साहित्याचे वाटप करण्यात आले. यात टाळ, मृदंग, वीणा, एकनाथी भागवत ग्रंथ, पताका आदी भजनी साहित्य वाटप केल्या गेले.
८० हजारावर भाविकांना एकादशीचा फराळ!
श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने एकादशी यात्रेनिमित्त सुमारे ८० हजाराच्यावर भक्तांनी फराळी महाप्रसादाचा लाभ घेतला. या फराळी महाप्रसादाकरिता साबुदाणा उसळ १०० क्विंटल, नायलॉन चिवडा ३० क्विंटल, खोबरा खिस २० क्विंटल, साखर २५ क्विंटल आदी साहित्याचा वापर करण्यात आला. श्रींच्या देहविसर्जन स्थळाजवळील श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन घेण्यास्तव लांब लांब रांगा लागलेल्या होत्या. श्रींची समाधी मूर्ती, श्री विठ्ठल रूपातच असल्याचा भास होत होता, हे विशेष. आषाढी एकादशीच्या याच दिनी श्री क्षेत्र पंढरपूर येथील कुकाजी पाटलांच्या वाड्यात बापुना काळे यांना श्री विठ्ठल रूपात श्री गजानन महाराजांनी दर्शन दिले आहे. श्रींचे भक्तांप्रती असलेले जिव्हाळ्याचे नाते आजतागायत असल्याचे दिसून येते. संस्थानमध्ये आषाढीला बाबूरावबुवा काळे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला. यावेळी हजारो भक्तांनी श्रवणाचा लाभ घेतला.
एसटी महामंडळाकडून विशेष व्यवस्था
शेगाव बस आगाराच्यावतीने विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले. यातून आषाढीला शेगाव आगाराला २ लाख रूपये उत्पन्न मिळाले. यात तेल्हारा ३ गाड्या, अकोला ३, अकोट ३, वरवट ३, खामगाव २, जळगाव ४, शेगाव १७ अशा अतिरिक्त गाड्यांची व्यवस्था केल्या गेली होती. ४ रोजी शेगाव ते पंढरपूर ४ फेऱ्या जादाच्या सोडण्यात आल्या.