चिखलीकरांना शिवजयंती उत्सवाचे वेध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:37 AM2021-02-09T04:37:41+5:302021-02-09T04:37:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : गेल्या काही वर्षांपासून चिखलीत शिवजयंती उत्सव भव्य-दिव्यतेने साजरा करण्यात येतो. सर्व चिखलीकरांना यंदाच्या शिवजयंती ...

Shiv Jayanti celebrations for Chikhalikars! | चिखलीकरांना शिवजयंती उत्सवाचे वेध !

चिखलीकरांना शिवजयंती उत्सवाचे वेध !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

चिखली : गेल्या काही वर्षांपासून चिखलीत शिवजयंती उत्सव भव्य-दिव्यतेने साजरा करण्यात येतो. सर्व चिखलीकरांना यंदाच्या शिवजयंती उत्सवाचे वेध लागले असून, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती यावर्षीही भव्यदिव्य प्रमाणात साजरी करण्यासाठी येथील सर्वधर्मीय व सर्वपक्षीय शिवभक्तांनी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सोमवार, ८ फेब्रुवारी रोजी उत्सवाच्या नियोजनाची बैठक पार पडली.

शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या बैठकीला आजी-माजी आमदारांसह, नगराध्यक्षा प्रतिनिधी, सर्व पक्षातील नेते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व सर्वधर्मीय शिवभक्त उपस्थित होते. या बैठकीत शिवजयंतीनिमित्त दिनांक १८ व १९ फेब्रुवारी रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा ठरविण्यासह सर्व बाबींवर विस्तृत चर्चा करण्यात आली. यामध्ये शिवभक्त शिवजयंती उत्सव समितीच्या नियोजित कार्यक्रम व सामाजिक उपक्रमांची माहिती देण्यात आली. यामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चिखली शहरात भव्यदिव्य शिवजयंती कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. सर्वधर्मीय, सर्वपक्षीय लोकांना सोबत घेऊन हा उत्सव साजरा होणार असून, १८ जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणार असून, त्याचदिवशी दुपारी ३ वाजता मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. तर १८ जानेवारीच्या मध्यरात्री १२ वाजता आतषबाजी व दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करून पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ८:३० वाजता पाळणा, दुपारी २ वाजता खामगाव चौफुलीपासून महाराजांच्या रथाची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाल्यानंतर जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाला बळी पडलेल्या लोकांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून ही रथयात्रा शहरातील मुख्य मार्गाने जाणार असून, संध्याकाळी राऊतवाडी स्टॉपवर या यात्रेचा समारोप होणार आहे. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाही येथील मुस्लिम समाजाचा शिवजयंती उत्सवात सहभाग राहणार असल्याची माहिती मुस्लिम समाजातील नेत्यांनी या बैठकीत दिली.

Web Title: Shiv Jayanti celebrations for Chikhalikars!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.