शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी पीडित महिलेशी साधला संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 04:03 PM2018-06-25T16:03:54+5:302018-06-25T16:06:50+5:30
बुलडाणा : पीककर्जासाठी चक्क शरीर सुखाची मागणी बँकेच्या शाखाधिकार्याने केल्याचे प्रकरण उजेडात आल्याने ज्या प्रमाणे पोलिस ठाण्यात दक्षता समित्या असतात त्या प्रमाणे बँकस्तरावरही स्थानिक एक दक्षता समिती स्थापन केल्या जावी.
- नीलेश जोशी
बुलडाणा : पीककर्जासाठी चक्क शरीर सुखाची मागणी बँकेच्या शाखाधिकाऱ्याने केल्याचे प्रकरण उजेडात आल्याने ज्या प्रमाणे पोलिस ठाण्यात दक्षता समित्या असतात त्या प्रमाणे बँकस्तरावरही स्थानिक एक दक्षता समिती स्थापन केल्या जावी. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केले जावेत, अशी मागणी शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली आहे. दाताळा पीककर्ज प्रकरणात त्यांनी २४ जून रोजी पीडित महिलेशी भ्रमणध्वनीवर संवाद साधून तिची परिस्थिती जाणून घेत शिवसेनेकडून या पीडित कुटुंबाला सर्वंकष मदत देण्याची तयारी दाखवली आहे. दरम्यान, त्यानुषंगाने आता शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव, जिल्हा शिवसेना प्रमुख जालिंधर बुधवत हे आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह जाऊन पीडित महिलेला बियाणे पोहोचवणार आहेत. शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी यासंदर्भात बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव आणि जिल्हा शिवसेना प्रमुख जालिंधर बुधवत यांच्याशीही २५ जून रोजी सविस्तर चर्चा केली आहे. दुसरीकडे निलम गोऱ्हे यांनी २४ जून रोजी पीडित महिलेशी शेगाव येथील गोपाल शर्मा यांच्या भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. पोलिसांनी संबंधीत पीडित कुटुंबाची सुरक्षीत व्यवस्था केली असल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात हे कुटुंब त्यांच्या गावातील स्वत:च्या शेतावर होते. यावेळी पीडित महिलेने अनेक लोक येऊन विचारपूस करून निघून जात असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात या कुटुंबास मदतीच्या दृष्टीने कोणी प्रयत्न केले नसल्याचे आपल्या निदर्शनास आल्याचे त्या म्हणाल्या. एैण पेरणीच्या हंगामात सर्व कागदपत्रे पूर्ण असतानाही या महिलेस कर्ज देण्याचे टाळण्यात आले होते. त्यामुळे आतापर्यंतच बँकेने महिलेचे कर्ज मंजूर करून मदत द्यायला हवी होती. त्यासंदर्भात बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव व जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत यांना आपण कल्पना दिली आहे. ते लवकरच या कुटुंबाला शेतीच्या पेरणीसाठी बी बियाणे देणार असल्याचे त्या म्हणाल्या. यासोबतच अन्य काही मदत या कुटुंबाला लागल्यास तिही देण्याची शिवसेनेची तयारी आहे, असे त्यांनी सांगितले.
दुसरीकडे २५ जूनलाच सायंकाळी पाच वाजता ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान या पीडित महिलेला देण्यात येणार आहे. नीलम गोऱ्हे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव आणि जिल्हा शिवसेना प्रमुख जालिंधर बुधवत यांनी जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांची भेट घेऊन अनुषंगीक कार्यवाही करण्याबाबत चर्चा ही केली आहे. बँकस्तरावर हवी समिती दाताळ््यासारखे गंभीर प्रकरण पाहता पोलिसांच्या जशा दक्षता समित्या आहेत त्या धर्तीवर बँक निहाय दक्षता समिती गठीत करण्याची गरज आहे. या समितीमध्ये किमान पाच ते सात स्थानिक व्यक्ती, अधिकारी यांचा समावेश राहल्यास असे गंभीर प्रकरण होणार नाही. सोबतच पीककर्जासंदर्भात असलेल्या अडचणी सोडविल्या जातीतील आणि असे प्रकार टाळण्यास मदत होईल. तसे झाल्यास बँकांचे उत्तरदायीत्व वाढले आणि कामामध्ये पारदर्शकता येईल, असे शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे म्हणाल्या.