लोणार सरोवरकाठी सेनेची बैठक; तिकीटाबाबत सस्पेन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 02:43 PM2019-09-09T14:43:50+5:302019-09-09T14:43:56+5:30
बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या पाच इच्छुकांशी खा. प्रतपाराव जाधव यांनी सात सप्टेंबर रोजी सायंकाळी गुफ्तगू केली.
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या १४ व्या विधानसभा निवडणुकीमध्ये बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या पाच इच्छुकांशी खा. प्रतपाराव जाधव यांनी सात सप्टेंबर रोजी सायंकाळी गुफ्तगू केली. त्यामुळे ही बैठक राजकीय वर्तुळात एक चर्चेचा विषय बनली आहे.
बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेमध्ये एकूण सहा जण इच्छूक आहेत. मात्र शिवसेनेतंर्गत येथे दोन गटात धुसफूस आहे. खा. प्रतापराव जाधव यांचा एक गट तर माजी आ. विजयराज शिंदे यांचा एक गट अशी स्थिती येथे आहे. त्यामुळे लोणारातील बैठकीला अपेक्षेप्रमाणे माजी आमदार विजयराज शिंदे हे उपस्थित नव्हते. त्यामुळे उर्वरित पाच जणांशी खा. प्रतापराव जाधव यांनी केलेल्या चर्चेबाबत उत्सूकता निर्माण झाली आहे.
मात्र बैठकीतील जी माहिती बाहेर आली आहे त्यानुसार खा. जाधव यांनी बुलडाण्यातील तिकिटासाठी कोणालाही शब्द दिला नसून ज्यांना तिकीट मिळेल त्यांचे काम सर्वांनी एक दिलाने करावे, असे सुचित केल्याचे सांगण्यात येत आहे. सोबतच पक्षात बंडखोरी होणार नाही, याची ग्वाहीही उपस्थित पाच जणांनी दिली. खाºया पाण्याच्या लोणार सरोवराच्या काठी असलेल्या एमटीडीसीच्या कक्षात ही बैठक झाली. या बैठकीस प्रामुख्याने शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत, माजी जिल्हा प्रमुख धिरज लिंगाडे, उपजिल्हा प्रमुख संजय गायकवाड, तालुका प्रमुख डॉ. मधुसूदन सावळे आणि पंचायत समिती सदस्य श्रीकांत पवार हे उपस्थित होते. वास्तविक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इच्छुकांना येथे एकटे एकटेच बोलावण्यात आले होते. मात्र नंतर ते एकत्र आले. वरकरणी पक्षाचे तिकीट कोणालाही भेटो एक दिलाने तिकीट मिळणाºयाचे काम करण्याबाबतचा निर्णय या बैठकी झाल्याचे सार आता प्रसारमाध्यमांना सांगितल्या जात आहे.
२०१४ मध्ये वाढलेल्या अनेकांच्या महत्त्वाकांक्षा, मतविभाजन, मतपरिवर्तनाचा फटका बसून बुलडाण्यातील शिवसेनेचे प्राबल्य जवळपास संपुष्टात आले होते. त्या पृष्ठभूमीवर मधल्या काळात शिवसेनेतंर्गत पुन्हा नव्याने मोट बांधण्यात आली.
तिकीटाच्या मुद्द्यावर आपसी वाद होऊ न देता ज्याला मातोश्रीवरून आशिर्वाद मिळेल, त्याचे काम सर्वांनी करण्याबाबतचाच निर्णय या बैठकीत झाल्याचे सुत्रांनी सांगितले. ज्यावेळी ही बैठक झाली त्यावेळी शिवसेनेकडून इच्छूक असलेले सहावे उमेदवार तथा माजी आमदार विजयराज शिंदे हे बुलडाण्यातच होते.
लोणारच्या खाºया पाण्याच्या सरोवर काठावर झालेल्या या बैठकीत तिकीटाचा सस्पेंस कायम असला तरी शिवसेनेच्या उमेदवाराचे काम एक दिलाने करण्याची भूमिका येथे स्वीकारण्यात आली. त्यामुळे सरोवर काठी झालेल्या या बैठकीनंतर कोणाच्या महत्त्वाकांक्षेच्या दुधात मिठाचा खडा पडतो हे येणारा काळच स्पष्ट करेल.
सर्व्हेक्षणानंतर मातोश्रीवर निर्णय
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रचतील उमेदवारी देण्याच्या पद्धतीत यंदा काहीसा बदल करण्यात आला आहे. प्रथमत: सर्व्हेक्षण करून विजयाची शक्यता तपासण्यात येऊन जनमानसाच्या मनात असलेला अर्थात जनमानसाला अभिप्रेत असलेला उमेदवारच देण्याबाबत मातोश्रीवरून निर्णय होईल, असे सांगण्यात आले.
शिवसेनेत गटतट नाही. मतदारसंघात विविध कार्यक्रमामध्ये एकदिलाने फिरा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्याला उमेदवारी देतील, त्याचे काम सर्वांनी एक दिलाने करावे. याबाबत आपण संबंधितांना सुचना दिल्या आहेत. समन्वयाने पक्षाच्या कामाला प्राधान्य देण्याबाबत आपण सुचीत केले.
- प्रतापराव जाधव, शिवसेना खासदार, बुलडाणा