शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांचे जात प्रमाणपत्र समितीकडून वैध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 09:32 PM2017-10-16T21:32:47+5:302017-10-16T21:52:16+5:30
मेहकर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांचे बलई जातीचे (अनु.जाती) प्रमाणपत्र बुलडाणा जात पडताळणी समितीने वैध असल्याचा निकाल सोमवारी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : मेहकर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांचे बलई जातीचे (अनु.जाती) प्रमाणपत्र बुलडाणा जात पडताळणी समितीने वैध असल्याचा निकाल सोमवारी दिला. शिवसेना कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी व ढोलताशांच्या निनादात या निर्णयाचे जोरदार स्वागत करण्यात आले.
मेहकरचे आमदार संजय रायमुलकर यांचे बलई सुतार जातीचे प्रमाणपत्र अवैध असल्याचा (दोन विरुद्ध एक) निर्वाळा अकोला विभागीय जात पडताळणी समितीने ३१ डिसेंबर २०१५ ला दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अॅड.साहेबराव सरदार यांच्या तक्रारीवरुन हा निकाल लागला होता. या निर्णयास आमदार संजय रायमुलकर यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करुन आव्हान दिले होते. नागपूर खंडपीठाने २३ मार्च २०१७ ला याबाबत आदेश दिला की, हे प्रकरण पूनश्च जात पडताळणी समितीकडे पाठवून सहा महिन्यात निकाल देण्याचे आदेश दिले होते. दरम्यान बुलडाणा येथे जात पडताळणी समिती कार्यालय असल्याने आमदार संजय रायमुलकर यांनी जात प्रमाणपत्र तपासणीसाठी पुराव्यासह जमा केले. १० आॅक्टोबर २०१७ ला या समितीने (त्रिसदस्यीय समिती) आमदार संजय रायमुलकर यांचे बलई जातीचे प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल दिला. हे पत्र सोमवारी पोष्टाने आमदार रायमुलकर यांना मिळाले. त्यानंतर आमदार संजय रायमुलकर यांचे स्वागत करण्यासाठी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी त्यांचे घरी धाव घेतली. तर स्थानिक शिवसेना कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. शिवसेना कार्यालयासमोरील जल्लोषात उपजिल्हाप्रमुख राजेंद्र गाडेकर, तालुकाप्रमुख सुरेश वाळूकर, शहरप्रमुख तथा उपनगराध्यक्ष जयचंद बाठीया, सभापती माधवराव जाधव, पं.स.सभापती जया कैलास खंडारे, उपसभापती बबनराव तुपे, जि.प.सदस्य आशिष रहाटे, उपतालुकाप्रमुख समाधान साबळे, माजी नगराध्यक्ष संजय जाधव, युवा सेना जिल्हा युवा अधिकारी ऋषी जाधव, पाणीपुरवठा सभापती ओम सौभागे, अर्थ व नियोजन सभापती तौफीक कुरेशी यांच्यासह शिवसैनिक हजर होते. यानंतर आ.संजय रायमुलकर यांच्या विजयाबद्दल शहरातील चौकाचौकात फटाके फोडण्यात आले.