Video: 'त्यांचे डोळे दिसतील....'; आदित्य ठाकरेंच्या आव्हानावर संजय गायकवाडांचा मिश्किल टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 02:23 PM2022-07-05T14:23:53+5:302022-07-05T14:31:02+5:30
शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.
बुलडाणा- बुलडाणाचे बंडखोर आमदार संजय गायकवाड आज मतदार संघात परतले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर भाष्य केलं. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला. शिवसेनेच्या आमदारांचे बंड पाहून खासदार संजय राऊत यांनी आमदारांना डुक्कर म्हटलं, रेडा म्हटलं, काहींचे बाप काढले. मात्र आम्हीही त्यांचा बाप काढू शकतो, असा इशारा संजय गायकवाड यांनी दिला.
आम्ही ४२ आमदारांनी राज्यसभेच्या निवडणुकीत संजय राऊत यांना मतदान केलं. त्यामुळे त्यांनी सांगाव आता हे ४२ आमदार त्यांचे बाप आहेत का?, असा सवाल उपस्थित करत संजय राऊतांनी आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि नंतर बोलावं, असं संजय गायकवाड म्हणाले. तसेच संजय राऊत हे राष्ट्रवादीची सुपारी घेऊन शिवसेना संपवायला निघाले होते, असा आरोपही संजय गायकवाड यांनी केला आहे.
बुलडाणा- शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय गायकवाड आज आपल्या मतदारसंघात दाखल झाले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना टोला लगावला. pic.twitter.com/uojrbPoO0h
— Lokmat (@lokmat) July 5, 2022
शिवसेनेचं धनुष्यबाण लवकरच आम्हाला मिळणार असून येत्या दोन ते तीन महिन्यांत सगळं चित्र स्पष्ट होईल, असं संजय गायकवाड यांनी सांगितलं आहे. त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देवमाणूस असून आजही सर्व आमदार त्यांचा आदर करतात. पण त्यांच्या भोवताली राष्ट्रवादी आणि काँग्रेस असल्यानं त्यांना सुचू देत नव्हते. त्यामुळे शिवसेनेला मोठा संघर्ष करावा लागत होता, असं संजय गायकवाड यांनी सांगितलं.
संजय गायकवाड यांना पत्रकार परिषदेत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्याबाबतही प्रश्न विचारला. आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना डोळ्यात-डोळे घालून बघावं, असं आव्हान दिलं आहे. यावर त्यांचे डोळे दिसतील, ते मिळवतील, असा मिश्किल टोला संजय गायकवाड यांनी लगावला. तसेच आम्ही अनेकवेळा आदित्य ठाकरे यांच्यासमोर जायचो, तेव्हा त्यांनी कधीच कोणत्याही आमदाराला नमस्कार देखील केला नाही, हे दु:ख आहे सर्व आमदारांचं, असं संजय गायकवाड यांनी सांगितलं.