शिवसेनेचे मतदारसंघनिहाय मेळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 04:39 PM2019-09-25T16:39:23+5:302019-09-25T16:39:27+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने स्व बळाची चाचपणी सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : पितृपंधरवाडाच्या शेवटच्या टप्प्यात युतीसाठी घटमांडणीची उभय बाजूंनी महाराष्ट्राच्या राजधानीत तयारी सुरू असतानाच मातोश्रीवरून आता थेट विधानसभानिहाय शिवसेनेच मेळावे घेण्याचे आदेश देण्यात आल्याने बुलडाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने स्व बळाची चाचपणी सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान खरेच भाजप-सेना स्वबळावर १४ विधानसभा निवडणूक लढणार आहेत की या माध्यमातून परस्परा विरोधात या माध्यमातून दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे ही बाब मात्र गुलदस्त्यात आहे.
दरम्यान, यासंदर्भात शिवसेनेच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर ‘लोकमत’शी बोलताना ही माहिती दिली. मुंबईत २४ सप्टेंबर रोजीच राज्यातील शिवसेनेच्या सर्व जिल्हा प्रमुखांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हे मेळावे घेण्याबाबतचे सुतोवाच करण्यात आले आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात येत्या दोन ते तीन दिवसात विधानसभा निहाय शिवसेनेचे मेळावे सुरू होणार असल्याचेही सुत्रांनी सांगितले.
गेल्या २०१४ विधानसभा निवडणुकीदरम्यान २५ सप्टेंबर रोजीच युतीची घटमांडणी न होता घटस्फोट होऊन दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. त्याला बुधवारी पाच वर्षे पूर्ण होतात. त्या मुहूर्ताच्या पूर्वसंध्येलाच शिवसेनेने विधानसभा निहाय मेळावे घेण्याचे निर्देशच मातोश्रीवरून मिळाल्याने विजयादशमीला युतीतून प्रसंगी शिवसेना सिमोल्लंघन करते की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.
एकीकडे सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभीच भाजपने बुलडाणा येथे सात विधानसभा मतदारसंघातील निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यावेळीही युती न झाल्यास भाजप स्वबळावर लढणार असल्याचे संकेत भाजपच्या पदाधिकाºयांनी दिले होते. त्यासंदर्भाने त्यावेळी तब्बल ६४ जणांनी सात विधानसभा मतदारसंघासाठी मुलाखती दिल्या होत्या.दरम्यान, आता मुंबईत शिवसेनेच्या संपर्कप्रमुख, जिल्हा प्रमुखांचीही २४ सप्टेंबर रोजी बैठक होऊन त्यात विधानसभा निहाय मेळावे घेण्याचे निर्देशच मातोश्रीवरून देण्यात आले. त्यामुळे ही शिवसनेची स्व बळाची चाचपणी आहे की युतीमधील परस्पर विरोधी दबावतंत्र आहे हे कळण्यास तुर्तास मार्ग नाही. नाही म्हणायला पितृपंधरवाड्याचा कालावधी कसाबसा काढण्याचा प्रयत्न उभय बाजूने होत असून त्यानंतर युतीसंदर्भात ज्या जागांवर घोडे अडले आहे त्यावर मार्ग काढण्याचाही प्रयत्न उभय बाजूंनी होण्याची शक्यता आहे.
बुलडाणा विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून भाजप-शिवसेनेत पेच आहे. प्रारंभी बुलडाणा लोकसभेची जागा ही भाजपची होती. मात्र माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्यासाठी १९९६ मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आग्रहाखातर ही जागा भाजपने शिवसेनेला दिली होती. त्या जागेच्या बदल्यात भाजपला आता जिल्हा मुख्यालयाचा बुलडाणा विधानसभा मतदारसंघ हवा आहे. भाजपही तसा दावा करत आहे.
युवा सेना प्रमुखांचाही घाटावरील भागात दौरा
युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचा गेल्या महिण्याच्या शेवटी बुलडाणा जिल्ह्याचा जनआशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने दौरा झाला होता. यावेळी त्यांनी प्रामुख्याने घाटावरील तीन मतदारसंघात आपल्या छोटेखानी सभा घेतल्या होत्या. त्यामुळे घाटावरील विधानसभा मतदारसंघात प्रामुख्याने आपली ताकद पणाला लावण्याचे प्रयत्न शिवसेनेकडून होत असल्याची चर्चा आहे.