मलकापुरात शिवसेनेचा चक्का जाम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 12:23 AM2017-11-07T00:23:23+5:302017-11-07T00:23:51+5:30
मलकापूर : शासनाने तत्काळ दुष्काळ जाहीर करावा, या व इतर मागण्यांसाठी शिवसेनेच्यावतीने सोमवारी राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : शासनाने तत्काळ दुष्काळ जाहीर करावा, या व इतर मागण्यांसाठी शिवसेनेच्यावतीने सोमवारी राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. जिल्हाप्रमुख दत्ता पाटील, शहरप्रमुख किशोर नवले, तालुका उपप्रमुख राजेशसिंह राजपूत, उमेश राऊत, किसान सेना तालुकाप्रमुख महादेव पवार, मुकेश लालवाणी, राजेश फुलोरकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करुन सरकारचा निषेध करण्यात आला.
अगोदरच निसर्गाच्या लहरीपणामुळे त्रस्त असलेल्या शेतकर्यांना भाजपा शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यात सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती आहे. अनेक शेतकर्यांनी सोयाबीनच्या उभ्या पिकात रोटाव्हेटर चालविले आहे. शेतकर्यांनी काबाडकष्ट करुन विपरित परिस्थितीत पिकवलेल्या मालाला भाव नाही. अनेक ठिकाणी हमी भावाने शासकीय खरेदी सुरु नाही तर सुरु असलेल्या शासकीय खरेदीवर जाचक निकषांमुळे शेतकर्यांना आपला माल विकण्यासाठी मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अशा गंभीर परिस्थितीतही भाजपा शासन गाढ झोपेत आहे. शेतकर्यांबद्दल त्यांना कुठलीही आपुलकी उरली नसल्याने शेतकरीराजा हवालदिल झाला आहे. अशा या झोपलेल्या कुंभकर्णी शासनाला जागे करण्यासाठी शिवसैनिकांनी सोमवारी राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर तब्बल १ तास चक्का जाम करीत सरकार चले जाव.. चले जाव, शेतकर्यांच्या मालाला भाव मिळालाच पाहिजे, कर्जमाफीची रक्कम तत्काळ जमा करा, आवाज कुणाचा शिवसेनेचा, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
यावेळी शहर पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर शेतकर्यांसाठी चक्का जाम आंदोलन करणार्या शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील, शहरप्रमुख किशोर नवले, उपतालुका प्रमुख राजेशसिंह राजपूत, कृउबास संचालक उमेश राऊत, किसान सेना तालुकाप्रमुख महादेव पवार, नगरसेवक मुकेश लालवाणी, राजेश फुलोरकर, व्यापारी सेनेचे जिल्हाप्रमुख दीपक चांभारे पाटील, शहर उपप्रमुख उमेश हिरुळकर, युवा सेना तालुकाप्रमुख दीपक जवरे, माजी तालुकाप्रमुख एकनाथ डवले, राजाराम पाटील, वासुदेव बोरले, गोविंदा बोरले, मधुकर चित्रांग, संभाजी सहावे, गजानन धाडे, विनायक बोरसे, विजय काळे, अजय कळमकर, चेतन शिंदे, देवीदास भोसले, सुखदेव पळसकर, गणेश कचोरे, दिनकर पवार, गजानन पवार, सुपडा सुरळकर, ज्ञानदेव कोल्हे, संदीप भंसाली, शशिकांत इंगळे, रितेश दहीभाते, संतोष घोळके, योगेश जैस्वाल, योगेश हिरुळकर, रमेश हिरुळकर, निना मेहंगे, शुभम बढे, अनंता कांडेलकर, श्रीकांत शर्मा, संतोष कोल्हे, गोपाल टावरी आदींसह तालुक्यातील अनेक शेतकर्यांना स्थानबद्ध केले.
वाहतुकीचा खोळंबा
शिवसेनेच्या या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा सुमारे तासभर खोळंबा झाला. महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होताल, तर आंदोलनकर्त्यांना अटक करुन सुटका करण्यात आली. सत्तेत सहभागी असतानाही शिवसेनेतर्फे करण्यात आलेले हे आंदोलन चर्चेचा विषय ठरले.