शिवजयंती जिल्ह्यात उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:40 AM2021-02-20T05:40:11+5:302021-02-20T05:40:11+5:30
या निमित्त महिला व पुरुषांनी पारंपरिक वेषभूषा धारण केली होती. बुलडाणा येथे स्थानिक गांधी भवनामध्ये शिवजयंतीचा हा उत्सव पार ...
या निमित्त महिला व पुरुषांनी पारंपरिक वेषभूषा धारण केली होती. बुलडाणा येथे स्थानिक गांधी भवनामध्ये शिवजयंतीचा हा उत्सव पार पडला. जयंतीच्या अनुषंगाने शहरातील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, उत्सव समितीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
सिंदखेड राजा येथील राजवाड्यावरून आणलेली अखंड ज्योत तथा रायगडावरील पवित्र माती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला घालण्यात आलेला जलाभिषेक हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. या जन्मोत्सव कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेनेे झाली. त्यानंतर बाल शिवाजीच्या वेशभूषेत अंश अभिलाश निकम या बाळाला पाळण्यामध्ये टाकून पाळणागीत सुहासनींनी गाऊन हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला.
यावेळी शौर्य व रुद्र ढोल ताशा पथकाने मानवंदना देऊन संचलन केले. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आ. संजय गायकवाड आणि शिवजयंती सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष कुणाल गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी राजमाता जिजाऊ मातेच्या वेशभूषेत श्रृष्टी व अंषुजा जाधव, बाल शिवाजी, बाल जिजाऊ व मावळ्यांच्या बालकांनी साकारलेल्या वेशभूषा लक्षवेधी होत्या.
या कार्यक्रमास माजी आ. विजयराज शिंदे, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष टी.डी. अंभोरे पाटील, सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे सचिव प्रा. अनिल रिंढे, जालिंधर बुधवत, रंजितसिंग राजपूत, राजेश हेलगे, डॉ. राजेश्वर उबरहंडे, सागर काळवाघे, अॅड. जयसिंग देशमुख, अंजली परांजपे, रवी पाटील, मोहन पऱ्हाड, गजेंद्र दांदडे, डॉ. गायत्री सावजी, सुनील सपकाळ, डॉ. आशिष खासबागे, शाहिना पठान, गोपालसिंग राजपूत, भारत शेळके, दीपक तुपकर उपस्थित होते.