शिक्षणाधिका-यांना शिवसेनेचा घेराव
By admin | Published: August 11, 2016 01:38 AM2016-08-11T01:38:09+5:302016-08-11T01:38:09+5:30
जिल्हा परिषद शाळावरील शिक्षकांचे रिक्त पदे भरण्याची मागणी.
संग्रामपूर (जि. बुलडाणा), दि १0 : तालुक्यातील निरोड व धामणगाव गोतमारे येथील जिल्हा परिषद शाळावरील शिक्षकांचे रिक्त पदे भरण्यासाठी शिवसेना संग्रामपूर तालुकाप्रमुख शांताराम दाणे यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी एन.के. देशमुख हे पंचायत समिती संग्रामपूर दौर्यावर आले असता त्यांना घेराव घातला. तालुक्यातील धामणगाव गोतमारे जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेत वर्ग १ ते ७ असून, शिक्षक मात्र तीनच आहेत. यामुळे विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली होती. मात्र संबंधितांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अखेर शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी ८ ऑगस्ट रोजी शाळेला कुलूप ठोकले होते. तर निरोड येथील शाळेवर सुद्धा हीच परिस्थिती असल्यामुळे व वर्ग १ ते ७ व शिक्षक ३, अशी परिस्थिती असल्यामुळे निरोड गावातील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व पालकांनी विद्यार्थी तसेच शिक्षकांना शाळेतून बाहेर काढून शाळेला २८ जुलै रोजी कुलूप ठोकले होते. पंधरवड्यात संग्रामपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दोन शाळांना शिक्षक मिळत नसल्यामुळे पालकांनी या शाळांना कुलूप ठोकले होते. दरम्यान, बुधवारी प्राथमिक शिक्षणाधिकारी एन.के. देशमुख हे संग्रामपूर दौर्यावर आले असता संग्रामपूर शिवसेना तालुकाप्रमुख शांताराम दाणे व इतरांनी शिक्षणाधिकारी एन.के. देशमुख व गटशिक्षणाधिकारी संग्रामपूर यांच्याकडे शिक्षकांची मागणी लावून धरीत घेराव घालत धारेवर धरले. यावेळी चर्चेअंती शिक्षणाधिकारी देशमुख यांनी तत्काळ धामणगाव येथील शाळेवर एका साधन व्यक्तीची व एका शिक्षकाची नियुक्ती केली.