गेले दिगंबर ईश्वर विभूती...राहिल्या त्या कीर्ती जगामाजी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 10:54 AM2021-08-05T10:54:33+5:302021-08-05T10:54:39+5:30
Shivshankarbhau Patil funeral in Shegaon : श्री गजानन महाराज की जय’ या श्लोकाचा गजर करीत भाऊंना अखेरचा निरोप दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : ‘गेले दिगंबर ईश्वर विभूती...राहिल्या त्या कीर्ती’ या अंभगाचे स्वर कानावर पडताच बुधवारी अवघी विदर्भ पंढरी शोकसागरात बुडाली. भरत खंडाला व्यवस्थापनाचे धडे देणारा व्यवस्थापन गुरू ब्रम्हात सामावल्याचे समजताच, बुलडाणा जिल्ह्यातील अनेकांची पावलं, शेगावकडे धावली. भाऊंना कृतीशीलतेतून श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी कमालिच्या शिस्तीत शेगावकर एकवटले. व्यावसायिकांनी लागलीच आपली प्रतिष्ठाने बंद केलीत. क्षर्णाधात अवघे शेगाव शांत झाले. अनेकांच्या डोळ्यांना अश्रृधारा लागल्या... निमित्त होते ते कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या अंत्यसंस्काराचे.
कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील यांचे निधन झाल्याचे सायंकाळी ५ वाजता जाहीर झाले. त्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील विविध संस्थानचे पीठाधीश, वारकरी, किर्तनकार ताबडतोब संत नगरीत दाखल झाले. श्री गजानन महाराज संस्थान सोबतच नागझरी येथील गोमाजी महाराज संस्थान, संत भोजने महाराज संस्थान अटाळी, जागृती आश्रम, दत्तुजी महाराज संस्थान, सखाराम महाराज संस्थान इलोरा, हनुमान संस्थान वारी हनुमान, बर्डेश्वर संस्थान तरवाडीचे पदाधिकारी आणि विश्वस्त शेगावकडे धावले. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, शेगावचे प्रभारी तहसिलदार डॉ. सागर भागवत, यांच्यासह श्री गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त, श्रीराम पुंडे आणि रफीकसेठ भाऊंच्या निवासस्थानी पोहोचले. ना.डॉ. शिंगणे, आ.अॅड. आकाश फुंडकर, आ. डॉ. संजय कुटे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.
‘अनंत कोटी ब्रम्हाड नायक’चा गजर!
हरिपाठानंतर ‘आपुल्या माहेरा जाईन मी आता’... या अभंगासोबतच गेले दिगंबर ईश्वर विभूती...राहिल्या त्या कीर्ती जगामाजी...या अभंगांनी भाऊंच्या अंत्ययात्रेला सुरूवात झाली. तोच संत नगरीतील आबाल वृध्दांनी ‘अनंत कोटी ब्रम्हाड नायक...महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सचितानंद भक्तप्रतीपालक शेगाव निवासी समर्थ सदगुरू श्री गजानन महाराज की जय’ या श्लोकाचा गजर करीत भाऊंना अखेरचा निरोप दिला.
मोहन भागवतांची शोकसंवेदना!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर संघचालक मोहन भागवत यांनी भ्रमणदूरध्वनीद्वारे आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्यात. आ. निळकंठदादा पाटील यांच्याशी संवाद साधून सरसंघचालकांनी ‘भाऊं’प्रती कृतज्ञता व्यक्त केली.
दीडतासात अंत्यसंस्काराचे नियोजन
भरत खंडातील व्यवस्थापनाचे गुरू असलेल्या शिवशंकर भाऊ पाटील यांच्या अंत्यसंस्काराचे नियोजन अवघ्या दीड तासात श्री गजानन महाराज संस्थानने केले. कोरोना काळात गर्दी होणार नाही, याची संपूर्ण खबरदारी श्री गजानन महाराज संस्थानने भाऊंच्या अंत्यसंस्काराप्रसंगी प्रामुख्याने पाळली.
सर्व धर्मियांची हजेरी!
शिवशंकरभाऊंच्या निधनाची वार्ता वाºयासारखी शेगावात पसरताच, अनेकांची पाऊले भांऊच्या घराच्या दिशेने वळली. गर्दी टाळत काहींनी बाळापूर रोडपरिसरातील इमारतींचा आसरा घेतला. सर्वच धर्मातील गणमान्य आणि मान्यवरांनी भाऊंना श्रध्दांजली अर्पण केली.
गर्दी टाळण्याचे आवाहन
व्यवस्थापन गुरूंच्या अंत्यविधीला अजिबात गर्दी होणार नाही, शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे व मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यविधी करण्याचे जाहीर करीत निळकंठदादा पाटील, श्रीकांतदादा पाटील यांनी गर्दी टाळण्याचे आवाहन केले. ‘आपण आमच्या दु:खात सहभागी आहातच...घरुनच श्रध्दांजली अर्पण करावी’ अशी भावनिक सादही भाऊंच्या निधनानंतर पाटील परिवाराच्यावतीने घालण्यात आली. शेगावकरांनीही या आवाहनाला प्रतिसाद देत, भाऊंच्या निवासस्थानाऐवजी परिसरातील इमारतींवरूनच भाऊंचे अखेरचे दर्शन घेतले.