धक्कादायक : अपमानाच्या वचप्यासाठी त्याने फोडली खामगाव शहरातील सलुनची चार दुकाने!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 01:31 PM2018-01-30T13:31:59+5:302018-01-30T13:37:04+5:30
खामगाव: परिस्थिती आणि मजबुरीमुळे एखादा चोर बनल्याच्या घटना नवीन नाहीत. मात्र, सलूनच्या दुकानात झालेल्या अपमानातून एका चोरट्याने चक्क चार सलूनची दुकाने फोडल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे.
खामगाव: परिस्थिती आणि मजबुरीमुळे एखादा चोर बनल्याच्या घटना नवीन नाहीत. मात्र, सलूनच्या दुकानात झालेल्या अपमानातून एका चोरट्याने चक्क चार सलूनची दुकाने फोडल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. दाढी करण्यास नकार दिल्याने आॅटोमॅटीक दाढीच्या मशीनसाठी चोरी केल्याची कबुली या चोरट्याने बेधडकपणे दिली. त्यामुळे पोलिसही चक्रावले आहेत.
खामगाव शहरातील मुख्य रस्त्यांवर असलेल्या तसेच बाजारपेठेतील तब्बल १८ दुकानांमध्ये चोरी झाली. गेल्या महिनाभरात लागोपाठ चोरीच्या या मालिकेने पोलिस प्रशासन हतबल झाले असतानाच, सी.सी. कॅमेºयाच्या माध्यमातून एका चोरट्याला पकडण्यात यश आले. हा चोरटा सध्या शहर पोलिस स्टेशनमध्ये जेरबंद आहे. तथापि, शहरात घडलेल्या अनेक चोरीच्या घटनांसाठी ‘तो’ कारणीभूत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. मात्र, या दुकानांमधून कोणतीही मोठी वस्तू अथवा मुद्देमाल चोरी न गेल्याने, क्षुल्लक अथवा किरकोळ कारणासाठीच हा चोरटा चोरी करत असल्याचे दिसून आले. या चोरट्याची कसून चौकशी केल्यानंतर चोरीच्या मालिकेतील एक चोरी केवळ त्याने घरात खायची सोय नसल्याची कबुली दिली. तर उर्वरित चोऱ्यांमधील काही चोऱ्या या दाढी करण्याच्या आॅटोमॅटीक मशीनसाठी केल्याची कबुली पोलिसांना दिली. चार-पाच दुकाने फोडल्यानंतर देखील दाढी करण्याची मशीन मिळाली नसल्याने या दुकानांच्या तोडलेल्या कुलूपांची विक्री केल्याचाही जबाब त्याने पोलिसांत नोंदविल्याचे सुत्रांनी सांगितले.
दाढी करण्यास मिळाला होता नकार!
शहरातील एका सलूनच्या दुकानात दाढी करण्यास गेल्यानंतर सलूनच्या संचालकाने आता दुकानात गर्दी आहे. आपल्याकडे वेळ नाही. तू जा- येथून! असे म्हणत दुकानातून हाकलून लावले होते. ही गोष्ट आपणाला अपमानास्पद वाटली. त्यामुळे दाढी करण्यासाठी यापुढे दुकानात न जाण्याचे ठरविले. यासाठी दाढी करण्याची मशीन चोरण्याचा इरादा केला. चार-पाच दुकाने फोडली. मात्र, एकाही दुकानात दाढीची मशीन मिळाली नसल्याची कबुलीही या चोरट्याने पोलिसांना दिली.