धक्कादायक....रानडुकराच्या हल्ल्यात महिलेचा हात धडावेगळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 08:07 PM2021-06-26T20:07:55+5:302021-06-26T20:08:05+5:30
Wild pig attacks on Women : रानडुकराने हल्ला करीत महिलेचा उजवा हात दंडापासून तोडून टाकल्याची घटना खळबळजनक घटना बेलाड येथे २६ जून रोजी सायंकाळी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : एका ४० वर्षीय मजूर महिलेवर रानडुकराने हल्ला करीत महिलेचा उजवा हात दंडापासून तोडून टाकल्याची घटना खळबळजनक घटना बेलाड येथे २६ जून रोजी सायंकाळी घडली. यामुळे परिसरातील शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बेलाड येथील सुनीता अर्जुन संबारे (वय ४० वर्ष) परिसरातील शेतातून मजुरीचे काम करून घरी परतत असतांना एका रानडुकराने अचानक तिच्यावर हल्ला केला. दरम्यान सोबत असलेल्या महिलांनी आरडा-ओरड केली. परंतु रान डुक्कराने त्या महिलेला सोडले नाही. आरडाओरडचा आवाज ऐकून परिसरातील शेतकरी त्या दिशेने लाठ्या काठ्या घेऊन मदतीला धावत आले. डुकराला त्यांनी हाकलण्याचा प्रयत्नही केला. परंतु रानडुकराने महिलेला सोडले नाही. चावा घेत महिलेचे लचके तोडत महिलेचा हात तोडल्यानंतर पळ काढला. या घटनेनंतर त्या महिलेला जखमी अवस्थेत मलकापुरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तिच्यावर प्राथमिक उपचार करीत पुढील उपचारार्थ जळगाव खान्देश येथे रेफर केले. ऐन पेरणीच्या तोंडावर रान डुक्कराने हिंसक हल्ला करीत महिलेला जखमी केल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतीची कामे कशी करावी असा प्रश्न सर्वांना पडला असून मोलमजुरी करणाऱ्या जखमी महिलेला वनविभागाने मदतीचा हात देत रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सुद्धा बेलाड येथील शेतकरी वर्गातून समोर आली आहे.