'दुकान सुरूच आहे...तुम्ही फक्त शटर वाजवा!'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 11:49 AM2021-04-11T11:49:19+5:302021-04-11T11:50:05+5:30
Lokcdown in Chikhli : अनेक व्यावसायिकांनी आदेश झुगारून आपली दुकाने आतून चालूच ठेवली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : 'ब्रेक द चेन' अंतर्गत कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात प्रशासनाने ३० एप्रिलपर्यंत सोमवार ते शुक्रवार जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. प्रशासनाचा हा आदेश पाळत शहरातील काही व्यावसायिकांनी गत पाच दिवस नियमांचे पालन केले; मात्र अनेक व्यावसायिकांनी 'दुकान सुरूच आहे... तुम्ही फक्त शटर वाजवा; आम्ही आतच आहोत'चा पवित्रा घेतल्याने शहरात लॉकडाऊनचा पुरता फज्जा उडाला होता.
काही किरकोळ व्यावसायिकांचा अपवाद वगळता वीक एण्ड लॉकडाऊनचा पहिला दिवस शहरात कडकडीत पाळला गेला.
चिखली शहर व तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठी आहे. सर्वच दवाखाने रुग्णांनी खचाखच भरलेले असून अनेक रुग्णांना ऐनवेळी बेड उपलब्ध होत नाहीत. दुसरीकडे रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आहे. एकूण अशी बिकट अवस्था असताना जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या निर्बंधांना गत पाच दिवस पावलोपावली बगल दिली गेली. काही व्यावसायिक नियमांचे पालन करीत निर्बंध लागू झाल्यापासून त्यांचे पालन करीत आहेत; मात्र 'बंदीत चांदी' करून घेण्याच्या हव्यासाने अनेक व्यावसायिकांनी आदेश झुगारून आपली दुकाने आतून चालूच ठेवली होती. परिणामी शहरात सर्वत्र दुकाने बंद दिसत असली तरी प्रत्यक्षात ती छुप्या पद्धतीने सुरूच होती. याशिवाय रात्रीच्या संचारबंदीचाही पुरता फज्जा उडताना दिसला. याखेरीज जीवनावश्यक सेवेतील दुकानांमध्ये कुठेही सोशल डिस्टन्सिंग व इतर नियम पाळले गेले नाहीत. प्रत्येक दुकानात नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे चित्र होते. गत पाच दिवसांत शहरातील हे चित्र पाहता वीक एण्ड लॉकडाऊनकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र वीक एण्ड लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी नागरिकांनी स्वंयस्फूर्तीने प्रतिसाद दिला असून काही किरकोळ व्यावसायिकांचा अपवाद वगळता इतर सर्वच दुकाने, बाजारपेठा बंद आहेत. रस्त्यावरही तुरळक प्रमाणात वाहतूक सुरू होती.