नाफेड केंद्रावर मोजमापात घोळ, शेतक-यांचा सोडून व्यापा-यांचा माल खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 11:26 PM2017-12-13T23:26:49+5:302017-12-13T23:27:10+5:30
शेगाव : उडीद, मूग विक्रीसाठी आणलेल्या शेतक-यांसोबत येथील नाफेड खरेदी केंद्रावर उद्धटपणाची वागणूक देत शेतक-यांचा सोडून व्यापा-यांचा माल खरेदी केल्याने मंगळवारी १३ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७.३० वाजता गोंधळ निर्माण झाला.
- विजय मिश्रा
शेगाव : उडीद, मूग विक्रीसाठी आणलेल्या शेतक-यांसोबत येथील नाफेड खरेदी केंद्रावर उद्धटपणाची वागणूक देत शेतक-यांचा सोडून व्यापा-यांचा माल खरेदी केल्याने मंगळवारी १३ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७.३० वाजता गोंधळ निर्माण झाला. मोजमापातही घोळ केला जात असल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे.
मंगळवारी नाफेड केंद्रावर अनेक शेतक-यांनी उडीद, मूग विक्रीसाठी आणले. संध्याकाळ झाली तरी खरेदीचा पत्ता नव्हता. शेतक-यांची २०० ते ३०० वाहने उभी असताना अचानक खरेदीस सुरुवात झाली. मध्येच एकाचा ट्रॅक्टर आत घेण्यात आला. त्यामुळे शेतक-यांनी माहिती काढली असता तो ट्रॅक्टर व्यापा-याचा निघाला. त्यामुळे शेतक-यांनी एकच गोंधळ केला. या प्रकाराची माहिती नाफेडच्या अधिका-यांना दिल्यानंतरही ते ऐकून घेण्यास तयार नव्हते, असा आरोप शेतक-यांनी केला आहे. या प्रकाराची माहिती तहसीलदारांना मिळाल्याने त्या ठिकाणी नायब तहसीलदार व पुरवठा अधिकारी, बाजार समिती सचिवाने धाव घेतली. शेतक-यांचे म्हणणे ऐकून घेतले. कुणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही शेतक-यांना मिळाल्यानंतर शेतकरी शांत झाले.
तो ट्रॅक्टर श्रीराम इस्टेटचा
१३ डिसेंबर हा माल खरेदीचा शेवटचा दिवस असल्याने ही गर्दी झाली होती. याठिकाणी श्रीराम इस्टेटचे गोडावून आहे. तेथून ट्रॅक्टरमध्ये उडिदाचा माल भरण्यात आला. मध्येच शेतक-यांच्या रांगेत ट्रॅक्टर उभा करण्यात आला. त्यामुळे हा गोंधळ उडाला.
शेतक-यांचे नोंदवले बयाण
मंडळ अधिकारी आर. बी. दीक्षित, पुरवठा अधिकारी चांभारे यांनी शेतक-यांचे बयाण नोंदवले. यामध्ये सैय्यद साजिद सैय्यद साबिर (मनसगाव), विनायक देवीदास फाटे (पहुरजीरा), संतोष ताराचंद चांडक (हाता), गोपाल पांडुरंग आखरे, वि. के. कंकाळ (मनसगाव) आदी शेतक-यांचा समावेश आहे.
झालेल्या प्रकाराबाबत आम्ही निश्चित चौकशी करू. यासाठी नाफेड केंद्र प्रमुखांना सांगितले आहे. शेतकºयांची तक्रार आम्ही घेतली आहे. - आर. बी. दीक्षित (मंडळ अधिकारी)