फाटलेला झेंडा फडकविल्याप्रकरणी शिपायास ‘शो-कॉज’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 08:41 PM2017-10-01T20:41:48+5:302017-10-01T20:43:06+5:30
वाशिम: स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयावर २७ सप्टेंबर रोजी फाटलेल्या अवस्थेत असलेला तिरंगा झेंडा फडकविण्यात आला. दरम्यान, हे गंभीर प्रकरण उजेडात येताच जिल्हा प्रशासनाने तडकाफडकी दखल घेत यास कारणीभूत असलेला शिपाई सुनील धानोरकर यास कारणे दाखवा नोटिस बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क

प्रशासकीय कार्यालयांसंदर्भात नियमावलीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयावर दररोज सकाळी देशाचा सन्मान असलेला तिरंगा झेंडा चढविला जातो. तसेच सायंकाळच्या सुमारास उतरविला जातो. दरम्यान, २७ सप्टेंबरला सुनील धानोरकर या शिपायाने सकाळी चढविलेला झेंडा चक्क फाटलेल्या अवस्थेत असल्याचा प्रकार उजेडात आला. यायोगे तिरंग्याचा अवमान झाल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास येताच वेळेपूर्वीच झेंडा उतरवून चांगल्या स्थितीमधील झेंडा चढविला. त्यामुळे एकाच दिवशी दुसºयांदा अनवधानाने का होईना प्रशासनाकडून नियम तोडण्यात आला.
यासंदर्भात वाशिमचे निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांना छेडले असता, २७ सप्टेंबरला झेंडा चढविण्याची आणि उतरविण्याची जबाबदारी असलेला शिपाई सुनील धानोरकर यास कारणे दाखवा नोटिस बजावली होती, असे सांगून ते म्हणाले, की झेंडा चढविला त्यावेळी तो सुस्थितीत होता; परंतू सुसाट्याच्या वाºयामुळे नंतर तो फाटल्याचा खुलासा शिपाई धानोरकर याने सादर केल्याची माहिती हिंगे यांनी ‘लोकमत’ला दिली.