सातपुड्याच्या पर्वतरांगेत रखरखत्या उन्हात ‘श्रमयोगीं’चा श्रमोत्सव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2022 13:46 IST2022-03-19T13:46:06+5:302022-03-19T13:46:29+5:30
Khamgaon News : सातपुड्याची माती लावत कपाळी, घामांच्या धारांच्या ‘श्रमोत्सवा’त अवघी तरूणाई न्हाली.

सातपुड्याच्या पर्वतरांगेत रखरखत्या उन्हात ‘श्रमयोगीं’चा श्रमोत्सव!
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: ४२ अंश सेल्सीअस तापमान... दुपारच्या रखरखते उन्हाची किंचितही तमा न बाळगता, शेकडो ‘श्रमयोगीं’नी शुक्रवारी अनोखी धुळवड साजरी केली. सातपुड्याची माती लावत कपाळी, घामांच्या धारांच्या ‘श्रमोत्सवा’त अवघी तरूणाई न्हाली.
घारेवाडी(कराड) येथील शिवम प्रतिष्ठानचे प्रणेते इंद्रजीत देशमुख (काकाजी) यांच्या पुढाकारात १८ ते २० मार्च या कालावधीत कोल्हापूर ते सालईबनपर्यंत मायभू सेवायात्रा आयोजित केली आहे. या सेवा यात्रेत कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो जिंदादिल तरूण सहभागी झाले आहेत. सालईबन येथे गुरूवारी सांयकाळी मायभू सेवा यात्रेचे आगमन झाले असून यात्रेतील श्रमयोगी सालईबनात शिवम बंधारा आणि सलग समतल चर (सीसीटी) बंधाºयांची निर्मिती करीत आहेत. त्यांना सालईबन मित्र मंडळ आणि आबालवृध्दांसह आदिवासींची साथ असून, सातपुड्याचं हिरवं स्वप्नं फुलविण्यासाठी ‘तरूणाई’ गत सहा वर्षांपासून सातत्याने झटत आहे. पर्यावरण रक्षणाला केंद्रस्थानी ठेवत पूरक उपक्रम राबविल्या जात आहे. कार्यक्रमाच्या सुरूवातीला ज्येष्ठ सर्वोदयी नेते जयवंत मठकर, तरूणाईचे मार्गदर्शक नरेंद्र लांजेवार, शिवम प्रतिष्ठाणचे यशवंत चौगुले(कोल्हापूर)आणि सर्जेराव लावंड (कराड) यांना श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली.
रंगोत्सवाला ‘शिवम’ची निर्मिती!
- कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्य. अधिकारी तथा शिवम प्रतिष्ठानचे प्रणेते इंद्रजित देशमुख यांच्या नेतृत्वात सालईबन येथे ४ लक्ष ११ हजार ७५० घ.मी. पाणी मावेल असा शिवम बंधारा आणि ४०.५ घ.मी. पाणी मावेल इतका सलग समतल चर (सीसीटी) खोदण्यात आलेत.