श्रावण बाळ, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:32 AM2021-02-12T04:32:35+5:302021-02-12T04:32:35+5:30
मेहकरः राज्यातील निराधार, वृद्ध व्यक्ती, अंध, दिव्यांग यांना आधार देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मासिक अर्थसहाय्य योजना लागू केल्या आहेत. या ...
मेहकरः राज्यातील निराधार, वृद्ध व्यक्ती, अंध, दिव्यांग यांना आधार देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मासिक अर्थसहाय्य योजना लागू केल्या आहेत. या योजनेचे नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यांचे अर्थसहाय्य तालुक्यातील लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले आहे. तीन महिन्यांचे एकत्रित असे पाच कोटी ८ लाख ३३ हजार २०० रुपये अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनेमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना गट आदी प्रकारच्या योजना स्थानिक पातळीवर महसुली यंत्रणेमार्फत राबविण्यात येतात. राज्यातील निराधार, वृद्ध व्यक्ती, अंध, दिव्यांग शारीरिक व मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, निराधार, विधवा, परित्यक्ता, अनाथ बालके, सिकलसेलग्रस्त, भूमिहीन, शेतमजूर इत्यादींचे जीवनमान सुसह्य करण्यासाठी शासनाने मासिक अर्थसहाय्य योजना लागू केली. त्यापैकी काही योजना राज्य शासनातर्फे व काही योजना केंद्र व राज्य शासनाच्याकडून राबवण्यात येतात. तालुक्यातील संपूर्ण गावात असलेल्या पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळवण्याकरता प्रत्येक योजनेकरिता लागणारी लाभार्थ्यांची पात्रता व कागदपत्रांची माहिती तहसील कार्यालयात सादर करण्यात आलेली आहे. याकरिता लाभार्थ्यांची प्रत्यक्ष पडताळणी करूनच पात्र लाभार्थ्यांची प्रकरणे सादर करून घेण्यात येतात. यामध्ये श्रावण बाळ व वृद्धापकाळचे लाभार्थी १२ हजार २११ एवढे आहेत. त्यांना तीन कोटी ६६ लाख ३१ हजार २०० रुपये अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. संजय गांधी निराधार योजनेमध्ये ५ हजार २८७ लाभार्थी असून, यांना एक कोटी ३० लाख २ हजार रुपये, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे ६० लाभार्थी असून, यांना १२ लाख असे एकूण पाच कोटी आठ लाख ३३ हजार २०० रुपये लाभार्थ्यांच्या बँकेच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे.
कोट...
जे लाभार्थी आहेत त्यांनी स्वतः वरील योजनांचे परिपूर्ण प्रस्ताव तयार करून कार्यालयात दाखल करावेत. कुठल्याही दलालामार्फत प्रस्ताव दाखल करण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत कुठलाही आर्थिक व्यवहार करू नये.
डॉ. संतोष मुंढे, नायब तहसीलदार, संगांयो, मेहकर.