श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने दसरा उत्सव साजरा
By admin | Published: October 13, 2016 02:09 AM2016-10-13T02:09:32+5:302016-10-13T02:09:32+5:30
गतिमंद विद्यार्थ्यांनी सादर केले सांस्कृतिक कार्यक्रम.
गजानन कलोरे
शेगाव, दि. १२-श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने ११ रोजी आनंद विसावा मैदानावर याहीवर्षी पारंपरिक पद्धतीने व गतिमंद विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणाने व्यवस्थापकीय विश्वस्त श्री शिवशंकरभाऊ पाटील व शहरवासीयांच्या उपस्थितीत दसरा उत्सव साजरा करण्यात आला.
श्रींची पालखी मंदिरातून दु.४ वा. रथ, मेणा, गज व अश्वासह सीमोल्लंघनाकरिता मार्गस्थ झाली. आनंद विसावा परिसरातील भव्य मैदानावर सायंकाळी पालखी पोहोचली. अत्तराने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. यानंतर श्री गजानन महाराज संस्थानच्या गतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गणेश वंदना नृत्य, ह्यशेतकरी नृत्यह्ण, ह्यसमूह नृत्यह्ण विठ्ठल दर्शन समूहनृत्य, जगदंब जगदंब आई तुळजाभवानी समूह नृत्य, अशा प्रकारची नृत्य सादर करून सर्वांची मने जिंकली. गेल्या २८ वर्षांपासून श्री गजानन संस्थानच्यावतीने या मुलांना सर्वसामान्य मुलांप्रमाणे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. श्रींच्या पालखी समवेत सहभागी टाळकरी यांनी ह्यआई साहेबांचा जोगवाह्ण याप्रसंगी पावलीसह सादर केला.
यावेळी श्रींची आरती व देवीची आरती करण्यात आली व पारंपरिक पद्धतीने आपट्याच्या झाडाच्या फांद्याची (सोन्याची) पूजा करण्यात आली व उपस्थित नागरिकांनी सोने लुटले.
श्रींच्या मुखवट्याचे व दुर्गादेवीच्या प्रतिमेचे भक्तांनी रांगेत शिस्तीने दर्शन घेतले. याप्रसंगी शहर तसेच बाहेरगावातील भाविकांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील, नारायणराव पाटील, गोविंदराव कलोरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. श्रींची पालखी सायंकाळी मंदिरात पोहोचल्यानंतर याठिकाणी महाआरती करण्यात आली व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.