श्री क्षेत्र वैष्णव गडावर भाविकांची मांदियाळी!
By Admin | Published: July 5, 2017 12:18 AM2017-07-05T00:18:30+5:302017-07-05T00:18:30+5:30
भाविक भक्तांना मंदिराच्यावतीने फराळ व चहाची मोफत व्यवस्था
काशिनाथ मेहेत्रे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा : सिंदखेडराजा येथून जवळच असलेल्या श्री क्षेत्र वैष्णव गडावर सानप गुरुजी यांच्या परिश्रमातून व जनतेच्या सहभागातून पंढरपूरच्या धर्तीवर प्रतिपंढरपूर रूक्मिणी-पांडुरंगाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २ मार्च २०१७ रोजी संपन्न झालेली आहे. पंढरपूरला दरवर्षी लाखो भाविक भक्त दर्शनासाठी जातात; परंतु वारकरी संप्रदायामधील असंख्य भाविक भक्तांना पंढरपूरला जाणे शक्य झाले नाही. अशा हजारो भाविक भक्तांनी ४ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र वैष्णव गडावर सकाळी ६ वाजतापासूनच रूक्मिणी पांडुरंगाच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. आलेल्या सर्व भाविक भक्तांना मंदिराच्यावतीने फराळ व चहा पाण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली होती.
आषाढी, कार्तीकी हेची आम्हा सुगी। शोभा पांडुरंगी घनवटे।। पंढरीची वारी आहे माझे घरी। अनिक न करी तीर्थ व्रत।। या अभंगाप्रमाणे आषाढ शुद्ध एकादशी व कार्तीकी एकादशी या दोन एकादशी वारकरी सांप्रदायामध्ये सणाप्रमाणे मानल्या जातात. सर्व वारकरी पंढरपूरची आषाढ शुद्ध एकादशी चुकवत नाही; पण ज्यांचं वय झालं, अडीअडचणीमुळे पंढरपूरला जावू शकत नाही, अशा भाविकांची निराशा होते. मातृतीर्थ सिंदखेडराजा परिसरात श्रीक्षेत्र वैष्णवगड येथे सानप गुरुजींनी परिश्रमातून व जनतेच्या सहभागातून पंढरपूरची प्रतिकृती उभारुन रूक्मिणी पांडुरंगाचे भव्य मंदिराची स्थापना केली. २ मार्च २०१७ रोजी मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे. मंदिर हेमाडपंथी पद्धतीचे असून, निव्वळ दगडी आहे. मंदिर बन्सी पहाडपूर या मार्बल दगडामध्ये बांधलेले असून, मंदिर बांधकामात लोखंड, लाकूड, किंवा सिमेंटचा वापर केलेला नाही. सदर मंदिर हे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. आषाढी एकादशीनिमित्त आज सकाळी सहा वाजतापासून भाविक भक्तांनी दर्शनासाठी रांग लावली ती संध्याकाळपर्यंत सुरूच होती. जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांमधून भाविक गाड्या, घोड्याने तसेच दिंड्या घेऊन हरिनामाचा गजर करीत दर्शनासाठी वैष्णव गडावर आले होते. उपस्थित सर्व भाविकांना मंदिराच्यावतीने फराळ, चहा-पाण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी सानप गुरुजी यांचे श्रीहरिकीर्तन संपन्न झाले, तर चोहीकडे हरिनामाचा गजर सुरु होता. हजारो भाविकांनी विठ्ठल रूक्मिणीच्या दर्शनाचा लाभ घेतला. त्यामुळे वैष्णव गडाला पंढरपूरचे रूप आले होते.