श्रींची पालखी मातृतीर्थ जिल्ह्यात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 01:45 AM2017-07-23T01:45:34+5:302017-07-23T01:45:34+5:30
श्री संत गजानन महाराजांची पालखी जालना-नाव्हा मार्गे विदर्भाच्या प्रवेशद्वारावर आली.
काशिनाथ मेहेत्रे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा : ब्रम्हांडनायक, शेगावीचा राणा श्री संत गजानन महाराजांची पालखीसह पायदळ दिंडी पंढरपूरच्या विठ्ठल, रूक्मिणी पांडुरंगाचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास करीत आहे. मराठवाड्यातील जालना शहरात दिंडीचा दोन दिवस मुक्काम आटोपून दिंडी २२ जुलै रोजी मार्गक्रमण करीत दुपारी दोन वाजेदरम्यान जालना ते नाव्हा मार्गे विदर्भाच्या प्रवेशद्वारावर आली. त्यावेळी दिंडीतील सर्व वारकर्यांनी भूमातेचे दर्शन घेतले.
आपल्या कर्मभूमीत प्रवेश करताच सर्व वारकरी गण गण गणात बोतेच्या बँडच्या अभंगावर हातात टाळ घेऊन बेधूंद नाचले. प्रवेश द्वारावर मुक्तीधाम आश्रमाच्यावतीने अनिरुद्ध महाराज, तहसीलदार संतोष कणसे, पोलीस निरीक्षक बळीराम गीते, पोलीस निरीक्षक जाधव, ठाणेदार संतोष नेमणार यांनी पुष्पहार घालून स्वागत केले. त्यानंतर माळ सावरगाव, तुळजापूर, अंचली नशिराबाद फाट्यावर गावकर्यांच्यावतीने वारकर्यांना नास्ता, चहा, फराळ देण्यात आले. त्यानंतर जिजामाता महिला अध्यापक व कृषी तंत्र महाविद्यालयाच्यावतीने अध्यक्ष तुकाराम खांडेभराड यांनी तसेच जिजाऊ सृष्टीवर अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील जय गजानन मित्रमंडळ यांनी शिरा, भजे, संत भगवान बाबा कला महाविद्यालयाचे अध्यक्ष भानुदास मुंढे यांनी फराळ चहा तसेच मोती तलावाजवळ डायमंडळ गणेश मंडळाच्यावतीने चहा नाश्ता देण्यात आला. यावेळी ह्यविठ्ठल माझा माझा माझा माझा, मी विठ्ठलह्ण अभंगाने मंत्रमुग्ध केले. मातृतीर्थ नगरी तर्फे नगराध्यक्ष अँड.नाझेर काझी, उपाध्यक्ष सीमा शेवाळे, सीताराम चौधरी, देवीदास ठाकरे, शिवसेनेचे अतिष तायडे, मुख्याधिकारी धनश्री शिंदे यांच्याहस्ते श्रींचे पूजन करण्यात आले. पोलीस निरीक्षक गीते, महसूल विभायीय अधिकारी विवेक काळे, तहसीलदार संतोष कणसे, बीडीओ भटकर यांनी श्रींचे दर्शन घेतले. पोलीस स्टेशनतर्फे ड्रायफ्रूटचे पाकीट दिले. त्यानंतर शोभायात्रा काढण्यात आली. सायंकाळी रामेश्वर मंदिर संस्थानचे अध्यक्ष तुळशिराम जामदार, डॉ.सचिन महाजन यांनी वारकर्यांना भोजन दिले. संध्याकाळी जिजामाता विद्यालयाच्या प्रांगणात दिंडीच्या मुक्कामवेळी श्रींची आरती, भजन, कीर्तन झाले. श्रींच्या दर्शनासाठी भाविक भक्तांचा जनसागर उसळला होता. दिंडीसोबत ५00 वारकरी, गज, घोडे, अश्व, डॉक्टरांची चमू, पाण्याची व्यवस्था होती. यावेळी पोलीस निरीक्षक, पीएसआय दर्जाचे ६ अधिकारी, स्थानिकचे २0 पोलीस कर्मचारी, बाहेरून बंदोबस्तासाठी आलेले १५ महिला कर्मचार्यांसह ३५ कर्मचार्यांचा तगडा बंदोबस्त होता.
पालखी आली पाऊस घेऊन
श्रीं ची पालखी पंढरपूरवरून बुलडाणा जिल्ह्याच्या हद्दीत येताच पावसानेही हजेरी लावली. मराठवाडा-विदर्भाच्या हद्दीवर माउलीचे आगमन होताच वरुणराजासुद्धा बरसला. पावसाच्या सरी वरुन पडत असतानाही रामनामाचा जयघोष करीत वारकरी आनंदात होते.