शिकागोत पार पडले श्री गजानन महाराज भक्त संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2021 04:30 PM2021-09-29T16:30:32+5:302021-09-29T16:30:39+5:30
Shri Gajanan Maharaj Bhakt Sammelan held in Chicago : अमेरिकेतील शिकागो येथे नुकतेच संत गजानन महाराज भक्त संमेलन संपन्न झाले.
- गजानन कलोरे
शेगाव : अमेरिकेतील शिकागो येथे नुकतेच संत गजानन महाराज भक्त संमेलन संपन्न झाले.
शिकागो अमेरिका येथे डॉ. श्री राम चक्रवर्ती यांचे काली बारी मंदिर आहे. मंदिर विस्तीर्ण जागेत आहे. मंदिरात कालीमातासोबत संत साईबाबांची मूर्ती आहेत. या मंदिरात कोलकाता येथून नेण्यात आलेली संत गजानन महाराजांची मूर्ती आहे. तसेच मुंबई येथील एका भाविक गजानन महाराज भक्ताने भेट दिलेली मूर्ती आहे. मंदिरात गजानन महाराजांची मूर्ती आहे, हे आसपासच्या भक्तांना कळावे, तिथे गजानन महाराज भक्तांनी एकत्र यावे, या निमित्ताने संत गजानन महाराज भक्त संमेलन आयोजित करण्याचे ठरविण्यात आले. कार्यकर्त्यांच्या या विचाराला राम चक्रवर्ती यांचा पाठिंबा मिळाला आणि अमेरिकेत संत गजानन महाराज भक्त संमेलन उत्साहात पार पडले. राम चक्रवर्ती आणि लीना चक्रवर्ती यांच्या कडून दीपप्रज्वलन करून संमेलनाचा शुभारंभ झाला. गजानन स्तवन होऊन भक्तीगीत, भजन आदी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. मेघना अभ्यंकर यांनी नांदेडकर गुरुजी यांच्यावर पुस्तक लिहीले आहे. हे पुस्तक शेगांवला चाळीस वर्षे समाधी मंदिरात पूजा करण्याचं भाग्य लाभलेल्या नांदेडकर गुरूजींवर लिहीले आहे. त्या पुस्तकाच्या इंग्लिश आवृत्तीचं विमोचन संमेलनात करण्यात आलं. तसेच मंदाकिनी पाटील यांनी भक्तांसमोर ‘संजीवन समाधी’ या विषयावर व्याख्यान दिले. तर ज्योत्स्नाताई मोदले यांनी आपण असावे निवांत तरीच भेटे जगन्नाथ या विषयावर मनोगत व्यक्त केले. मुखोदगत पारायणकर्ते डॉ गजानन खासनीस यांनी उपस्थितांना अभिषेकाचं महत्व समजावून सांगितले. कार्यक्रमात शेवटी विद्याताई पडवळ यांचे आॅनलाईन श्रीगजानन विजय ग्रंथाचं संपूर्ण मुखोदगत पारायण सादर केले.
कार्यक्रमाची पूर्व तयारी म्हणून शेगांवहून गजानन महाराजांच्या एकशे एकवीस पितळी मूर्त्या नेण्यात आल्या. त्या मूर्त्या भक्तांना देण्यात आली. संमेलनात काही मूर्त्यांवर प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळी तर काही मूर्त्यांवर भक्तांच्या घरी अभिषेक करण्यात आला. वेगवेगळ्या शहरातून, राज्यातून सहाशे भक्त संमेलनात सहभागी झाले होते.
भाविकांना साहित्य पाठविणार
संत गजानन महाराजांशी संबंधित विविध ग्रंथ साहित्य काली बारी मंदिरात उपलब्ध आहे. अमेरिकेत स्थायिक असलेल्या संत गजानन महाराजांच्या भक्तांसाठी विविध राज्यात पाठविण्यात येणार आहे.