खामगावात श्री गणेश विसर्जन मिरवणुकीस शांततेत सुरूवात
By अनिल गवई | Published: September 17, 2024 01:12 PM2024-09-17T13:12:54+5:302024-09-17T13:13:48+5:30
खामगावात चोख पोलिस बंदोबस्त : लाकडी गणेशाचे आगमन झाल्यानंतर मिरवणुकीस प्रारंभ
अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : घरगुती गणेशाचे पहाटेपासून तर सार्वजनिक गणेश मंडळाच्या श्री गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीला मानाचा लाकडी गणपती सहभागी झाल्यानंतर सकाळी ९.२५ वाजता फरशी येथून सुरुवात झाली.
येथील श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत २९ श्री गणेश मंडळे सहभागी झाली आहेत. विसर्जन मिरवणुकीत श्री गणेश मंडळांकडून विविध सामाजिक आणि प्रबोधनात्मक देखावे सादर करण्यात आले. मिरवणुकीत गांधी चौकातील वंदे मातरम मंडळाने यंदा प्रथमच सादर केलेल्या हरियाणा हिस्सार येथून बाहुबली हनुमान व शिव तांडव नृत्य पथकाने हा देखावा अबालवृद्धांची आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. या देखाव्यासह विविध आखाड्यांच्या मल्लांनी सादर केलेले चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी अनेकांचे लक्ष वेधले. श्रींच्या विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी खामगाव शहरात चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
मान्यवरांकडून मानाच्या गणपतीचे पूजन
सकाळी ९: १५ वाजता अय्याची कोठी येथे मानाच्या लाकडी गणपतीची आरती करण्यात आली. आरतीनंतर लाकडी गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली. मानाचा लाकडी गणेश फरशी येथे पोहोचल्यानंतर खामगावातील एकापाठोपाठ गणेश मंडळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालीत. लाकडी गणेशाच्या आरतीला जिल्हा पोलीस अधिक्षक विश्व पानसरे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात, लाकडी गणेश मंडळाचे अध्यक्ष सुरज अग्रवाल, मुख्य व्यवस्थापक आर.बी. अग्रवाल, डॉ. अनिल चव्हाण, संजय झुनझुनवाला यांच्यासह मान्यवरांनी आरती केली. फरशी येथे मिरवणूक आल्यानंतर खामगाव मतदार संघाचे आमदार अॅड. आकाश फुंडकर मिरवणुकीत सहभागी झाले. यावेळी माजी नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा, अलकादेवी सानंदा, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे, गणेश विसर्जन मिरवणूक बंदोबस्त प्रभारी पोलीस निरिक्षक सुनिल अंबुलकर, शहर पोलीस निरिक्षक रामकृष्ण पवार, शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे पितांबर जाधव, व्ही.वाय.देशमुख आदी उपस्थित होते. मिरवणुकीत मानाचा लाकडी गणेश त्यानंतर तानाजी मंडळ तर तिस?्या स्थानी हनुमान मंडळाचा गणपती आणि नंतर विविध गणेश मंडळ मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी विविध गणेश मंडळांच्या आखाड्यांनी मल्लखांब तसेच रोप मल्लखांबाची प्रात्यक्षिक सादर केले. तर वंदे मातरम मंडळाचा गणपती सकाळी १० वाजता मिरवणुकीत सहभागी झाला. वंदेमातरम मंडळाच्या अघोरी नृत्याने मिरवणुकीत चांगलाच रंग भरला.