श्रीराम निळे यांची महाराष्ट्र संघात निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:33 AM2021-08-29T04:33:02+5:302021-08-29T04:33:02+5:30
महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती लक्षात घेता राज्यस्तरीय स्पर्धेला परवानगी न मिळाल्याने महाराष्ट्र टग ऑफ वार असोसिएशनच्यावतीने महाराष्ट्र राज्य रस्सीखेच संघाची ...
महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती लक्षात घेता राज्यस्तरीय स्पर्धेला परवानगी न मिळाल्याने महाराष्ट्र टग ऑफ वार असोसिएशनच्यावतीने महाराष्ट्र राज्य रस्सीखेच संघाची निवड चाचणी आभासी पद्धतीने घेण्यात आली. यात बुलडाणा जिल्हा रस्सीखेच संघातील खेळाडू श्रीराम निळे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. यापूर्वी पोहेकॉ श्रीराम निळे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन, श्रीलंका, नेपाळ येथे भारत देशाचे खेळाडू म्हणून ७ वेळा प्रतिनिधीत्व करून १ वेळा रौप्यपदक, ४ वेळा कांस्यपदक मिळविण्याचे प्राविण्य प्राप्त केले आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र राज्याचे ९ वेळा प्रतिनिधीत्व करुन ५ वेळा कांस्यपदक व राज्यस्तरावर बुलडाणा जिल्ह्याचे १२ वेळा प्रतिनिधीत्व करून ४ वेळा सुवर्णपदक, १ वेळा रौप्यपदक, २ वेळा कांस्य पदक प्राप्त केले आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस दलाचे व बुलडाणा जिल्ह्याचा नाव लौकीक केला आहे. निवड झालेले आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रीराम निळे (पोलीस हवालदार )यांचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, अप्पर पोलीस अधिक्षक बजरंग बनसोडे, उपविभगीय पोलीस अधिकारी विलास यामावर, पोलीस निरीक्षक गिरीष ताथोड पोलीस निरिक्षक आत्माराम प्रधान, पोलीस निरीक्षक निर्मला परेदशी पोलीस स्टेशन मेहकर तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, टग ऑफ वार फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव तथा महाराष्ट्र टग ऑफ वॉर असोसिएशन अध्यक्षा माधवी पाटील, सचिव जनार्दन गुपीले, बुलडाणा जिल्हा टग ऑफ वार असोसिएशनचे अध्यक्ष छत्रपती पुरस्कार प्राप्त शेषनारायण राजकुमार शर्मा आदींनी काैतुक केले आहे.