अयोध्येतील श्रीराम मंदिर राष्ट्रीय नवनिर्माणाचा प्रारंभ ठरेल : सिद्धलिंग शिवाचार्य स्वामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:52 AM2021-01-08T05:52:37+5:302021-01-08T05:52:37+5:30
येथील श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी संग्रह समर्पण समितीच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. ५ जानेवारी रोजी ...
येथील श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी संग्रह समर्पण समितीच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. ५ जानेवारी रोजी आयोजित या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बुलडाणा विभाग संघचालक चित्तरंजन राठी, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा संघचालक शांतीलाल बोराळकर, भागवताचार्य साध्वी त्रिवेणी देशमुख व अभियानाचे जिल्हा संयोजक गजानन ठाकरे यांची उपस्थिती होती. सिद्धलिंग शिवाचार्य स्वामींच्या हस्ते श्रीराममूर्तीचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यालयाचे उद्घाटन व अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. आपल्या आशीर्वचनात स्वामींनी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या निर्मितीनंतर काशी येथील विश्वनाथ मंदिर आणि मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मुक्ततेचा मार्ग अधिक प्रशस्त होईल, असे सांगितले. चित्तरंजन राठी यांनी अभियानाची माहिती दिली. बुलडाणा जिल्ह्यात ८ तालुक्यांतील ५५४ गावांमध्ये हे अभियान राबविले जाणार असून प्रत्येक रामभक्तापर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन राठी यांनी केले. प्रास्ताविक अभियानाचे जिल्हा संयोजक गजानन ठाकरे, सूत्रसंचालन जिल्हा सहसंयोजक माधव धुंदळे यांनी केले. तर आभार नगर संयोजक विलास श्रीवास्तव यांनी मानले. विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि रामभक्त या प्रसंगी उपस्थित होते.
शुभारंभ प्रसंगी जमा झाला २ लाखांपर्यंत निधी
स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकामधील धीरज कथने यांच्या एजन्सीच्या इमारतीत सुरू झालेल्या या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन आणि निधी संग्रह अभियानाचा शुभारंभ झाला. याप्रसंगी अनेक दानशूर व्यक्ती आणि संस्थांच्या योगदानातून २ लाखांपर्यंत निधी जमा झाला. कार्यालयातून अभियानाचे जिल्हा, तालुका व नगरस्तरीय कामकाज चालणार आहे. येथे दररोज सायंकाळी साडेसात वाजता श्रीराम आरती करण्यात येणार असल्याने कार्यकर्ते व रामभक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.