राज्यातील ५२९ गावांमध्ये ‘श्वासानंद’ नामजप अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 04:50 PM2019-11-16T16:50:29+5:302019-11-16T16:50:37+5:30
हा नामजप आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशीपर्यंत घेण्यात आला असला तरी हे अभियान कार्तिक पोर्णिमेपर्यंत सुरू होते.
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा : चातुर्मासानिमित्त राज्यातील ५२९ गावांमध्ये श्वासानंद नामजप अभियान राविण्यात आले. ‘ॐ ब्रह्मी श्वासानंदाय नम:’ असा हा नामजप आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशीपर्यंत घेण्यात आला असला तरी हे अभियान कार्तिक पोर्णिमेपर्यंत सुरू होते.
मेहकरच्या श्रीक्षेत्र ज्ञानमंदिर संस्थानमध्ये जन्मलेले एकोणिसाव्या शतकातील संत बाळाभाऊ महाराज पितळे उर्फ श्वासानंद माऊली यांना इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या धर्मक्रांतीचे प्रणेते म्हणून ओळखल्या जाते. त्यांच्या गुरुगादीवरील चौथे उत्तराधिकारी अॅड. रंगनाथ महाराज पितळे यांच्या आदेशाने त्यांच्या भक्तांतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात ५२९ लहानमोठ्या गावांमध्ये ‘श्वासानंद नामजप अभियान’ राबविण्यात आले. एकाचवेळी एवढ्या गावांमध्ये सारख्याच पद्धतीने शिस्तबद्धरित्या राबविल्या गेलेल्या या उपक्रमाची आध्यात्मिक प्रांतात विशेष दखल घेतल्या जात आहे.
संत बाळाभाऊ महाराज यांचा भक्तवर्ग राज्यात आणि देशातच नव्हे तर विदेशातही विखुरलेला आहे. गुरुभक्तांच्या या विशाल संप्रदायाचे संवाहक विद्यमान पीठाधीश अॅड. रंगनाथ महाराज पितळे यांनी महाराजांच्या महामंत्राचा सामुहिक नामजप करण्याची प्रेरणा दिली. आणि राज्यस्तरीय नामजप अभियान समिती गठित होऊन या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. चातुर्मासातील चार महिन्यांचा पवित्र कालावधी या अभियानासाठी निवडण्यात आला. या उपक्रमाच्या विशेष नोंदपुस्तिका तयार करण्यात येऊन त्या राज्यस्तरीय समितीचे संयोजक सुरेश बोचरे (औरंगाबाद), सहसंयोजक श्रीरंग सावजी (मेहकर), श्वासानंद सेवा मंडळाचे अध्यक्ष आशिष उमाळकर यांच्या नेतृत्वाखालील चमूने महाराष्ट्रात सर्वत्र पोचविल्या. या उपक्रमाला गुरुभक्तांकडून उदंड प्रतिसाद मिळाला.
अभियानाची सांगता चातुर्मास समाप्तीनंतर मेहकरच्या श्रीक्षेत्र ज्ञानमंदिर संस्थानमध्ये गायत्री परिवाराच्या पौरोहित्याखाली विधिवत होम-हवन करून या अभियानाची सांगता करण्यात आली. कार्तीक पोर्णिमेला या अभियानाची सांगता झाली. मुंबईपासुन ते चंद्रपूरपर्यंत एकूण ५२९ गावांमध्ये ठरविलेल्या पद्धतीनुसार शिस्तबद्धरीतीने हे अभियान राबविण्यात आले.