श्वेता महालेंनी केली संगणक परिचालकांची सुटका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:34 AM2021-03-05T04:34:38+5:302021-03-05T04:34:38+5:30
विविध ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत संगणक परिचालकांनी आपल्या मागण्यांसंदर्भाने मुंबईस्थित 'आझाद मैदानावर' २२ फेब्रुवारीपासून आंदोलन चालविले आहे. या आंदोलनाला १० दिवस ...
विविध ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत संगणक परिचालकांनी आपल्या मागण्यांसंदर्भाने मुंबईस्थित 'आझाद मैदानावर' २२ फेब्रुवारीपासून आंदोलन चालविले आहे. या आंदोलनाला १० दिवस उलटूनही शासनाच्या वतीने अद्याप दखल घेण्यात आलेली नाही. दरम्यान, आंदोलनकर्त्यांचे शिष्टमंडळ ग्रामविकासमंत्र्यांची भेट घ्यायला गेले असता, त्यांच्यावर अमानुष पद्धतीने लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोपही आंदोलकांकडून करण्यात आला आहे. तथापि, लोकशाही व अहिंसकमार्गाने आंदोलन करत असलेल्या परिचालकांवरसुद्धा लाठीचार्ज करून मैदान खाली करण्यात आले. आंदोलनकर्त्यांमध्ये अनेक महिला आहेत, याचासुद्धा विचार शासनाने लाठीचार्ज करण्याआधी केला नाही, असा आरोप संगणक परिचालकांनी केला आहे. दरम्यान, ४ मार्चला आंदोलनकर्त्यांचे शिष्टमंडळ पुन्हा एकदा ग्रामविकासमंत्र्यांची भेट घ्यायला गेले असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यामध्ये बुलडाणा जिल्हाध्यक्ष नीलेश खुपसे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश ठोकरे, जिल्हा सचिव सचिन झाल्टे, सचिन तरमळे, सुनील जवंजाळ यांचा समावेश होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर आ. श्वेता महाले यांनी मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संगणक परिचालकांची तत्काळ सुटका करून घेतली. त्यांच्याशी चर्चा करून त्यांचे प्रश्न समजून घेतले. संगणक परिचालकांना न्याय देण्यासाठी भाजपा या अधिवेशनात आक्रमकपणे त्यांचे प्रश्न मांडेल व त्यांना न्याय मिळेपर्यंत लढा देणार असल्याची ग्वाही आ. महालेंनी संगणक परिचालकांना दिली आहे. यावेळी भाजपाचे युवा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील व कार्यकारिणी उपस्थित होते.