सिकलसेल, थॅलेसेमिया रुग्णांना महिन्याला हवे १५० बॅग रक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 11:47 AM2021-05-04T11:47:55+5:302021-05-04T11:48:03+5:30
Blood Bank : कोरोना काळातही पुरेसा रक्तसाठा उपलब्ध असून सर्व रुग्णांना वेळेवर रक्त देण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
- योगेश देऊळकार
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीत करण्यात आलेल्या नोंदणीनुसार जिल्ह्यात सिकलसेल, थॅलेसेमिया व हिमोफेलियाचे एकूण १७३ रुग्ण आहेत. या आजाराच्या रुग्णांना नियमित रक्तपुरवठा करणे गरजेचे असते. त्यांना महिन्याला १५० बॅग रक्ताची आवश्यकता भासते. कोरोना काळातही पुरेसा रक्तसाठा उपलब्ध असून सर्व रुग्णांना वेळेवर रक्त देण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जिल्ह्यातील सर्व रक्तपेढ्यांमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा भासतो. यामध्ये प्रामुख्याने एप्रिल व मे महिन्यातील अवस्था अतिशय बिकट असते. विविध सामाजिक संघटनांनी आयोजित केलेल्या शिबिरांच्या माध्यमातून रक्तपेढ्यांना रक्ताचा साठा उपलब्ध करून देण्यात येतो. मात्र उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नागरिक रक्तदानासाठी समोर येत नाहीत. त्यामुळे नियमित रक्तपुरवठ्याची आवश्यकता असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त मिळत नाही. सिकलसेलच्या रुग्णांना दर दोन ते तीन महिन्यांनी तर थॅलेसेमियाच्या रुग्णांना दर २१ दिवसांनी नियमित रक्तांची आवश्यकता भासते. हिमोफेलियाच्या रुग्णांनाही ठरावीक कालावधीनुसार रक्त चढविणे गरजेचे असते.
जिल्ह्यात सध्या थॅलेसेमिया १०७, सिकलसेल ६३ तर हिमोफेलियाचे ३ रुग्ण आहेत. यापैकी काही रुग्ण स्थानिक शासकीय रुग्णालयांमधून रक्त घेतात. जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीत सध्या २०० बॅग रक्तसाठा उपलब्ध आहे.
यामुळे उपरोक्त सर्व आजाराच्या रुग्णांना वेळेवर रक्तपुरवठा करणे शक्य होत असल्याचे सकारात्मक चित्र आहे.
जिल्ह्यातील अनेक सेवाभावी संस्थांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. या माध्यमातून जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीसह जिल्ह्यातील सर्व रक्तपेढ्यांना रक्ताचा पुरवठा करण्यात येतो. रक्तपेढीत जमा करण्यात आलेले रक्त केवळ ३५ दिवसांपर्यंत टिकून राहू शकते. त्यामुळे एकाच दिवशी रक्तदान शिबिर न घेता योग्य नियोजन करून आठवडा किंवा पंधरवड्याच्या फरकाने रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे.
-डॉ. ज्ञानेश्वर राऊत,
रक्त संक्रमण अधिकारी, रक्तपेढी, जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणा