लॉकडाऊनचे संकेत; सुटीच्या दिवशीही बैठकांचे सत्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 11:12 AM2020-07-05T11:12:27+5:302020-07-05T11:12:57+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात १३ ही तहसिलदार आणि सहा एसडीओंची प्रदीर्घ काळत बैठक घेण्यात आली.
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यातील वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्याचे संकेत मिळाले असून चार जुलै रोजी सुटीच्या दिवशीही जिल्हाधिकारी कार्यालयात १३ ही तहसिलदार आणि सहा एसडीओंची प्रदीर्घ काळत बैठक घेण्यात आली. त्यामुळे प्रसंगी येत्या एक दोन दिवसात याबाबत अधिकृत घोषणा होण्याचे संकेत सुत्रांनी दिले आहेत.
विभागीय आयुक्तांनी तीन जुलै रोजी अचानक बुलडाणा येथे भेट देवून कोरोना संसर्गाची साखळी रोखण्याच्या दृष्टीकोणातून जिल्हास्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली होती. सोबतच कोरोना संसर्गाची जिल्ह्यात व्याप्ती वाढणार नाही, याबाबत जिल्हा प्रशासनास गंभीरतेने उपाययोजना उचलण्याच्याचे निर्देश दिले होते. दरम्यान याच कालावधीत जिल्ह्याचा हॉटस्पॉट ठरलेल्या मलकापूर तालुक्यात मधल्या काळात करण्यात आलेल्या उपाययोजनामुळे तेथे वर्तमान स्थितीत कोरोना संसर्गाचा डाऊनफॉल सुरू झाल्याचे चित्र आहे. ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर चार जुलै रोजी पुन्हा जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांची सुट्टी असतानाही जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही बैठक उशिरापर्यंत सुरू होती. बैठकीत अधिकाºयांकडून तालुका निहाय सविस्तर माहिती व कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये संदिग्ध आढळलेल्या व्यक्तींची संख्या, हायरिस्क कॉन्टॅक्ट असलेल्यांची संख्या तथा सध्याची कोरोना संसर्गाची स्थिती याबाबत सविस्तर माहिती संकलीत करीत संभाव्य लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी कशी होईल याचीही माहिती घेण्यात आली.
पोलिस प्रशासनाचाही लॉकडाऊनचा प्रस्ताव
पोलिस प्रशासनानेही कोरोना संसर्गाचा वाढता धोका पाहता जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव दिला असल्याची माहीती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे तहसिलदार, एसडीओ यांच्याकडून त्यांच्या तालुक्यात व उपविभागातील एकंदर स्थितीचा विचार व कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमधील संदिग्ध व्यक्तींची संख्या विचारात घेवून याबाबत जिल्हा प्रशासनाने सविस्तर माहिती मागवली आहे.