जिजाऊ जन्मोत्वासाठी सिंदखेड राजा नगरी झाली सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 02:02 PM2020-01-11T14:02:58+5:302020-01-11T14:04:59+5:30
यंदाचा हा ४२२ वा जन्मोत्सव सोहळा आहे. आयोजन समितीच्यावतीने सोहळ््याच्या दृष्टीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेड राजा: राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांच्या जन्मोत्सवासाठी सिंदखेड राजा नगरी सज्ज झाली असून जिजाऊ सृष्टीवर त्यानुषंगाने जय्यत तयारी करण्यात आली आहे. १२ जानेवारी रोजीच युवराज छञपती संभाजी राजे भोसले यांना मराठा विश्वभुषण पुरस्कार तर बबीता ताडे यांना जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे.
जन्मोत्सवानिमित्त भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून येथे सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. लाखोंच्या संख्येने होणारी गर्दी पाहता येथे वाहनतळ, दुकाने, उपहारगृह, प्रकाश व्यवस्था आणि जिजाऊ सृष्टीवर रंगरंगोटी करण्यात आली आहे. १२ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सव स्थळी मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी सुर्याेदयी जिजाऊ पुजन करून जिजाऊ सृष्टीवर पोहोचतील. या सोहळ््यासाठी राज्यासह परदेशातून भाविक मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे येत असतात. यंदाचा हा ४२२ वा जन्मोत्सव सोहळा आहे. आयोजन समितीच्यावतीने सोहळ््याच्या दृष्टीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. येथे ४०० पेक्षा अधिक बुक स्टॉलही उभारण्यात आले आहेत.
दरम्यान, ११ जानेवारी जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला माँ जिजाऊंच्या जन्मस्थळ असलेल्या राजवाड्यापासून ते जिजाऊ सृष्टीपर्यंत मशाल यात्रा काढण्यात येऊन दीपोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. हालगीच्या निनादात महिला पारंपारिक वेष परिधान करून हातात मशाली घेऊन यात सहभागी होतात. संभाजी ब्रीगेड व जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने ही मशाल यात्रा राजवाडा ते जिजाऊ सृष्टीपर्यंत काढण्यात येते.
१२ जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता महापुजा, साडेसहा वाजता राजवाडा येथे शिवकिर्तन, सकाळी नऊ वाजता जिजाऊसृष्टीवर ध्वजवंदन होईल. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम तथा पुस्तकांचे प्रकाशन सोहळे होणार आहेत. सामुहिक विवाह सोहळ््यांसह विविध कार्यक्रम दुपारी दीड वाजेपर्यंत येथे चालतील. त्यानंतर दुपारी दोन वाजता शिवधर्मपीठावरील मुख्य कार्यक्रमास प्रारंभ होईल. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले, युवराज्ञी संयोगीता संभाजीराजे भोसले, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खा. प्रतापराव जाधव, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, मधुकर मेहेकरे, मनोज आखरे यांच्यासह अन्य उपस्थित राहणार आहे. दरम्यान मराठा सेवा संघातर्फे दिला जाणारा मराठा विश्वभुषण पुरस्कार युवराज छत्रपती संभाजी राजे भोसले यांना तर जिजाऊ पुरस्कार बबीताताई ताडे (अमरावती) यांना प्रदान करण्यात येईल. शेवटी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांचे समारोपीय मार्गदर्शन होईल.
( शहर प्रतिनिधी )