दारूबंदीसाठी शिंदी ग्रामस्थांचे उपोषण
By admin | Published: July 17, 2017 02:06 AM2017-07-17T02:06:36+5:302017-07-17T02:06:36+5:30
महिलांचा उपोषणात सर्वाधिक सहभाग
लोकमत न्यूज नेटवर्क
अंढेरा: शिंदी येथील अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी, या मागणीसाठी १५ जुलैपासून शिंदी येथील ग्रामस्थांनी गावातच उपोषण सुरू केले आहे. यामध्ये महिलांचा सर्वाधिक सहभाग आहे.
सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी येथे अवैध दारूची वाहतूक व विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे त्यामुळे दररोज भांडणतंटे होत आहे. गावामध्ये दारू पिण्यासाठी चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. महिलांना कुठल्याही प्रकारचे संरक्षण नाही. गावातील जातीय सलोखा बिघडून तेढ निर्माण होत आहे. गावामध्ये महिलाच दारू विक्रीचा व्यवसाय करतात. बऱ्याच वेळा दारूबंदीसाठी निवेदने देऊनसुद्धा दारू विक्री बंद झाली नाही. यापूर्वी दारू उत्पादन शुल्क विभाग बुलडाणा येथील कार्यालयामध्ये बारगजे कार्यरत असताना मोर्चा नेऊनही कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. त्यामुळे शिंदी येथे ग्रामस्थांनी १५ जुलैपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी जि.प. सदस्य दिनकरराव देशमुख यांनी उपोषणाला भेट दिली.
उपोषणामध्ये रेखा सूर्यवंशी, सुनीता खरात, पार्वती बंगाळे, मिना बेलोडे, वर्षा दळवी, मंदाकिनी गवई, ज्योत्स्ना तोडे, लिलाबाई खंडारे, गुंफाबाई बुरकुल, प्रा. बंगाले, सचिन खंडारे, विलास तोडे, सोपान भांड, अनिल खंडागळे, उकंडा खंडारे, आकाश खंडारे, अक्षय खंडागळे यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.