सिंदखेड राजात काेराेना रुग्णांची संख्या वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:43 AM2021-02-25T04:43:48+5:302021-02-25T04:43:48+5:30
सिंदखेड राजा : तालुक्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. रुग्ण वाढणाऱ्या अन्य तालुक्यांच्या तुलनेत येथील आकडा कमी असला तरीही प्रतिबंध ...
सिंदखेड राजा : तालुक्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. रुग्ण वाढणाऱ्या अन्य तालुक्यांच्या तुलनेत येथील आकडा कमी असला तरीही प्रतिबंध म्हणून प्रशासन अनेक उपाययोजना करीत आहे. दरम्यान, सिंदखेड राजा तालुक्यात सध्या कोरोनाचे ४५ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. बुधवारपर्यंत १,३१६ तपासण्या झाल्या असून येथील रुग्ण वाढीचा दर ४.३९ टक्के आहे.
सिंदखेड राजा शहरात सध्या कोरोनाचे १३ रुग्ण असून ग्रामीण भागात ३२ रुग्ण असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र साळवे यांनी दिली. मागील कोरोना काळात येथील सहकार विद्या मंदिरात कोविड केअर सेंटर होते. मध्यंतरी रुग्ण कमी असल्याने हे सेंटर बंद करण्यात आले होते. मात्र आता हे सेंटर पुन्हा सुरू करण्यात येणार असून कोरोना असलेल्या रुग्णांना गृहविलगीकरण न करता आता सुविधा वाढवून सेंटरमध्येच उपचार देण्यात येणार आहेत. यासाठी प्रशासन तयारी करीत आहे. जवळच असलेल्या देऊळगाव राजा येथे रुग्ण वाढ झपाट्याने होत आहे. त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगून डॉ. साळवे यांनी शहरातील सुपर स्प्रेडरची ज्यात दुकानदार, फळ, भाजी विक्रेते, किराणा दुकानदार, फेरीवाले यांचा समावेश आहे या सर्वांची टप्प्याटप्प्याने तपासणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.