सिंदखेड राजा तालुक्यातील परीक्षा केंद्रप्रमुख, पेपर रनर बदलले
By संदीप वानखेडे | Published: March 4, 2023 06:14 PM2023-03-04T18:14:30+5:302023-03-04T18:15:21+5:30
पेपर फुटल्याने शिक्षण विभागाची कारवाई : बुलढाण्यातील केंद्रप्रमुखांवरही कारवाई
बुलढाणा : सिंदखेड राजा तालुक्यात इयत्ता बारावीच्या गणित विषयाचा पेपर फुटल्याप्रकरणी शिक्षण विभागाने कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील पाचही केंद्राचे प्रमुख तसेच पेपर रनर बदलण्यात आले आहेत. या विषयीचे आदेश अमरावती विभागीय मंडळाचे विभागीय सचिव उल्हास नरड यांनी ३ मार्च राेजी रात्री बजावले आहेत. तसेच प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देणाऱ्या बुलढाण्यातील परीक्षा केंद्रप्रमुखांना शिक्षणाधिकाऱ्यांनी नाेटीस बजावली आहे.
इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेचा गणिताचा पेपर ३ मार्च राेजी सकाळी साडे दहा वाजताच समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आला हाेता. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली हाेती. तसेच हा विषय विधानसभेतही गाजला हाेता. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पेपर फुटीची माहिती घेतली असता सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाल्याचे समाेर आले हाेते. दरम्यान, या प्रकरणी शिक्षण विभागाच्या तक्रारीनंतर सिंदखेड राजा पाेलिसांनी अज्ञात आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच प्रकरण साखरखेर्डा पाेलिसांकडे वर्ग केले आहे. या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकाराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सिंदखेड राजा तालुक्यातील परीक्षा केंद्र क्रमांक ६०३, ६०४, ६०५, ६०७ आणि ६१७ चे केंद्रप्रमुख आणि पेपर रनर बदलण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्रप्रमुख आणि पेपर रनर यांची माहिती बाेर्डास तातडीने कळविण्यास सांगितले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"