सिंदखेडराजा : चारित्र्याच्या संशयावरून शिक्षकाने केला पत्नीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 02:58 AM2017-12-11T02:58:08+5:302017-12-11T03:00:02+5:30
सिंदखेडराजा: येथील एका शिक्षकाने चारित्र्याच्या संशयावरून वर्षभरापासून विभक्त राहत असलेल्या शिक्षक पत्नीचा धारदार चाकूने गळा चिरून खून केल्याची घटना १0 डिसेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या प्रकरणी मृतक शिक्षिकेच्या भावाने सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा: येथील एका शिक्षकाने चारित्र्याच्या संशयावरून वर्षभरापासून विभक्त राहत असलेल्या शिक्षक पत्नीचा धारदार चाकूने गळा चिरून खून केल्याची घटना १0 डिसेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या प्रकरणी मृतक शिक्षिकेच्या भावाने सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सुलभा सरोदे असे मृतक महिलेचे नाव आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील रहिवासी सुलभा हिचे लग्न सिंदखेड राजा येथील प्रफुल्ल प्रभाकर सरोदे याच्यासोबत १३ वर्षांपूर्वी झाले होते. सुलभा ही सिंदखेड राजा नगर परिषद मराठी प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती, तर प्रफुल्ल सरोदे हा उगला येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होता. दरम्यान, १२ वर्ष सुरळीत संसारात त्यांना दोन मुले झाली; परंतु प्रफुल्ल सरोदे हा गेल्या एक वर्षापासून पत्नीवर संशय घेत होता. त्यामुळे त्यांच्यात नेहमीच भांडणे होत असल्यामुळे सुलभाने सिंदखेड राजा येथे भावाच्याच घराशेजारी पतीपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता. तिचा भाऊ वीज वितरण कंपनीत कार्यरत आहे. १0 डिसेंबर रोजी दुपारपासून नशेत असलेल्या प्रफुल्लने रात्री पत्नीच्या घरी जाऊन तिचा गळा चिरून खून केल्याचे मृतकाचा भाऊ धनंजय लंभाटे यांनी सांगितले.धनंजय वसंतराव लंभाटे यांनीच पोलिसांत या प्रकरणी तक्रार दिली. घटनेची माहिती कळताच ठाणेदार बळीराम गीते व त्यांचे सहकारी सहायक पोलीस उपनिरीक्षक नेमणार व अन्य पोलीस कर्मचारी लगोलग घटनास्थळी पोहोचले. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याचे मृत सुलभाचा भाऊ धनंजय लंभाटे यांनी सांगितले. घटनेनंतर मृत सुलभाचा पती तेथून फरार झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. वृत्त लिहीपर्यंत पोलिसात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
- चार महिन्यांपूर्वी मृतक सुलभाने प्रफुल्ल सरोदेपासून फारकती घेण्यासाठी दारव्हा कोर्टात अर्ज केला होता. सुलभाचा खून झाला तेव्हा त्यांची दोन्ही मुले ही आजी-आजोबाकडे ह७ोती.