सिंदखेडराजा तहसीलदार, दोन सहकाऱ्यांसह एसीबीच्या जाळ्यात
By निलेश जोशी | Published: April 12, 2024 11:23 PM2024-04-12T23:23:57+5:302024-04-12T23:24:13+5:30
३५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
सिंदखेडराजा : येथील तहसीलदार सचिन जयस्वाल यांच्या सहकाऱ्यांना ३५ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या बुलढाणा पथकाने रंगेहाथ पकडले आहे. शुक्रवारी (दि. १२) दुपारी ३ वाजता तहसील कार्यालय परिसरातच ही घटना घडली. तहसीलदार सचिन जयस्वाल, चालक मंगेश कुलथे, शिपाई पंजाबराव ताठे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. जयस्वाल यांच्या सिंदखेडराजातील शासकीय निवासस्थान व परभणी येथील घरातून ४६ लाख ९२ हजार १८० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
तालुक्यात वाळूची अवैध वाहतूक वाढली आहे. अनेक वाहनांवर कारवाई करण्यात आली तर अनेक वाहने आर्थिक व्यवहार करून सोडण्यात येतात. मागील आठवड्यात असेच वाळूच्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली होती. वाळू वाहतूक करण्यासाठी नियमबाह्य परवानगी मिळविण्यासाठी अनेक वाळू वाहतूकदार तहसीलदार यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आर्थिक देवाण-घेवाण करून परवानगी मिळवितात. अशीच परवानगी या प्रकरणातील तक्रारदाराने काही दिवसांपूर्वी मागितली होती. मात्र, तशी नियमबाह्य परवानगी मिळत नसल्याने संबंधित तक्रारदाराने तहसीलदार यांचे चालक मंगेश कुलथे यांच्याशी बोलणी केली. आर्थिक व्यवहार करून वाळू वाहतूक करता यावी यासाठी लाचेची रक्कम ठरली.
या दरम्यान तक्रारदार यांनी बुलढाणा लाचलुचपत विभागाने दोन दिवसापासून या प्रकरणाची तालीम केली. शुक्रवारी (दि. १२) दुपारी ३ वाजता ठरल्याप्रमाणे तहसील कार्यालय परिसरात तहसीलदार यांचे चालक मंगेश कुलथे यांनी ३५ हजार रुपये लाच स्वीकारली आणि सापळा लावलेल्या लाचलुचपत पथकाच्या अधिकाऱ्यांनी कुलथे यांना घेऊन तहसीलदार यांच्या कक्षात नेले. तहसीलदार जयस्वाल हे निवडणूक विभागात कार्यरत होते. तेथून त्यांना पाचारण करण्यात आले. एसीबीने तत्काळ पुढील कारवाई करून तिघांना ताब्यात घेण्यात आले.
ऐन निवडणूक काळात झाली कारवाई
सध्या लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. सिंदखेडराजा हे विधानसभा मुख्यालय आहे. तहसीलदार यांच्यावर निवडणूक काळात मोठी जबाबदारी असते. अशातच हा ट्रॅप झाल्याने निवडणूकसंबंधी कामावर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासन तात्कालिक तहसीलदार म्हणून कोणाची नियुक्ती करणार, असाही प्रश्न आहे. या कारवाईमुळे मात्र तहसील कार्यालय परिसरात खळबळ उडाली होती.
४६ लाखांची रोकड जप्त
एसीबीच्या पथकाने तहसीलदार जयस्वाल यांच्या शासकीय निवासस्थानाची झडती घेतली असता तेथे ३७ लाख ५२ हजार १८० रुपये, तर परभणी येथील निवासस्थानातून ९ लाख ४० हजार रुपये ताब्यात घेतले आहे.