सिंदखेडराजा नगर परिषद स्वीकृत सदस्य पदासाठी चार उमेदवारी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 02:57 PM2019-04-17T14:57:37+5:302019-04-17T14:57:42+5:30
दोन नामनिर्देशन पदांसाठी मंगळवारी चार उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेड राजा : सिंदखेडराजा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष व दोन नामनिर्देशन सदस्यांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. २० एप्रिल रोजी नगर परिषदेच्या सभागृहात विशेष सभा बोलावून तेथेच घोषणा होणार असल्याची अधिकृत माहिती मिळाली. दोन नामनिर्देशन पदांसाठी मंगळवारी चार उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आले.
सिंदखेडराजा शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. राजमाता जिजाऊ यांचे माहेरघर म्हणून सिंदखेडराजाची ओळख आहे. जिजाऊ जन्मदिनी देशभरातून जिजाऊ भक्त दरवर्षी जिजाऊ यांच्या राजवाड्यात त्यांच्या दर्शनासाठी येतात. मातृतीर्थ सिंदखेडराजा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक २४ मार्च रोजी पार पडली. जनतेमधून शिवसेना- भाजपा युतीचे सतीष भागुजी तायडे नगराध्यक्षपदी विराजमान झाले. आता नगर परीषदेच्या निवडणूकीमध्ये शिवसेना भाजपा युतीचे नगर अध्यक्ष व आठ सदस्य विजयी झाले. तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे आठ सदस्य निवडून आले. एक अपक्ष उमेदवार विजयी झाले. अपक्ष उमेदवाराने शिवसेनेला पाठींबा दिल्यामुळे शिवसेना युतीचे संख्याबळ नऊ झाले. नगर परिषद उपाध्यक्षपदासाठी भाजपा न.प.सदस्या नंदा मेहेत्रे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. नामनिर्देशन सदस्य पदाच्या दोन जागेसाठी शिवसेना भाजपा युतीकडून त्र्यंबकराव ठाकरे व दिलीप आढाव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून सिताराम चौधरी व जगन ठाकरे यांनी १६ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केले. उपाध्यक्षपदासाठी २० एप्रिल रोजी नगर परिषद कार्यालयात अर्ज दाखल करण्यात येणार आहे. नामनिर्देशन सदस्य व उपाध्यक्षाची निवड झाल्याची घोषणा त्याच दिवशी होईल, अशी माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी एच. डी. विर यांनी दिली. (शहर प्रतिनिधी)