मेहकरात लसीकरण केंद्रावर एकच गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:28 AM2021-05-03T04:28:27+5:302021-05-03T04:28:27+5:30
मेहकर : शहरात दिवसेंदिवस कोरोना विषाणू रुग्णांची संख्या वाढत असून, येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेल्या लसीकरण केंद्रावर लसीकरण ...
मेहकर : शहरात दिवसेंदिवस कोरोना विषाणू रुग्णांची संख्या वाढत असून, येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेल्या लसीकरण केंद्रावर लसीकरण घेणाऱ्यांची एकच गर्दी होत आहे. येथे सर्रास सर्व नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गंभीरतेने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
राज्यात सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू आहे. शासनाने ४५ वर्षांच्या वरील नागरिकांसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू केले आहे. मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात सकाळपासूनच लसीकरण घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची फिजिकल डिस्टन्सिंग दिसत नसल्याने, कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लसीकरण घेणाऱ्या लोकांना भर उन्हात रांगेत उभे राहावे लागत आहे. या ठिकाणी नागरिकांसाठी पिण्याचे पाण्याची व्यवस्थाही नाही व उन्हात उभे असलेले लोकांना कोणत्याही प्रकारची सावलीचीही व्यवस्था करण्यात न आल्याने वयोवृद्ध लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. या लसीकरण केंद्रावर यापूर्वी नागरिकांनी पहिला डोस घेतला होता. मात्र, दुसरा डोस घेण्यासाठी या ठिकाणी कोणतीच वेगळी व्यवस्था करण्यात आलेली नाही. रॅपिड तपासणी लसीकरण केंद्रावर लसीकरण घेण्यासाठी येणाऱ्या लोकांची एकच गर्दी होत आहे, तर दुसरीकडे त्याच्या बाजूला रॅपिड तपासणीही करण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. त्यामुळे कोण कशासाठी आलेला आहे, हे या ठिकाणी समजत नाही. त्यासाठी रॅपिड तपासणीसाठी वेगळी व्यवस्था करावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून, या परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.